Anganewadi Bharadi Devi Jatra : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. आज सकाळी प्रथेप्रमाणे धार्मिक विधी व देवीचा कौल घेऊन यात्रेची तारीख निश्चित करण्यात आल्याची माहिती आंगणे कुटुंबीयांनी दिली आहे. कोकणातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या आंगणेवाडीची जत्रा महाराष्ट्रासह देश-विदेशातल्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. दरवर्षी आंगणेवाडीच्या जत्रेत लाखो भाविक उपस्थिती लावत असतात. मालवणच्या मसुरे गावातील आंगणेवाडी या ठिकाणी असलेल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होत असतात.
नवसाला पावणारी देवी
मसुरे गावाच्या आंगणेवाडीतील भराडी देवीची ख्याती राज्यभर आहे. नवसाला पावणारी देवी असा भराडी देवीचा लौकिक आहे. भरडावर देवी प्रकट झाल्याने या देवीचे नाव भराडी देवी असे ठेवण्यात आले आहे. भराड म्हणजे माळरान, या देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला असलेला परिसर हा माळरान आहे त्यामुळेच या देवीला भराडी देवी असे नाव पडले आहे.
हे ही वाचा : देवेंद्र फडणवीस-अजित पवार दिल्लीत, एकनाथ शिंदे मात्र मुंबईत; नेमकं चाललंय काय? मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट!
आंगणेवाडीतल्या आंगणे कुटुंबाची ही देवी आहे. मात्र नवसाला पावणारी देवी असा भराडी देवीचा लौकिक आहे. त्यामुळे या जत्रेला दरवर्षी लाखो लोक येत असतात. आता यंदा २२ फेब्रुवारी २०२५ रोजी आंगणेवाडीची जत्रा भरणार आहे. दरम्यान भराडी देवीचे दर्शन सर्वांसाठी खुले असते. गाऱ्हाणे आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचे दर्शन घेतात.
हे ही वाचा : कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
दरवर्षी पाच ते सात लाख भाविकांची उपस्थिती
केवळ दीड दिवस चालणाऱ्या भराडी देवीच्या जत्रेला दरवर्षी सुमारे पाच ते सात लाख भाविक उपस्थितीती लावत असतात. आंगणेवाडीच्या भराडी देवीचा (Bharadi Devi) नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून करतात. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो.
या देवीचा चरितार्थ चिमाजी आप्पांनी इनाम दिलेले दोन हजार एकर भरड आणि शेतजमीन आंगणे लोकांच्या वहिवाटीखाली आहे. देवीची जत्रा शेतीची कामे आटोपल्यावर ठरते. सर्वजण एकत्र येतात व डाळप करतात. त्यानंतर शिकार करून देवीचा कृपाप्रसाद घेतल्यानंतर एक महिना पूर्वीच देवीच्या उत्सवाची तिथी निश्चित होते.