सोलापूर : उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने अंगणवाडी सकाळच्या सत्रात सुरू करावी, चेहरा पडताळणीची सक्ती थांबवावी, सहा वर्षांपर्यंतच्या मुलांचे छायाचित्र काढण्याची सक्ती बंद करावी, प्रोत्साहन भत्त्यातील जाचक अटी रद्द कराव्यात आदी विविध १३ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात अंगणवाडी सेविका, मदतनीस संघटनेच्या सोलापूर शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयावर छत्री मोर्चा नेला. यावेळी मोर्चेकरी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आक्रमक पवित्रा घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या.

दुपारच्या रणरणत्या उन्हात चार हुतात्मा पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चात हजारापेक्षा अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस डोक्यावर छत्री घेऊन सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड राज्य उपाध्यक्ष व हेमा गव्हाणे, जिल्हा सरचिटणीस सरला चाबूकस्वार व उपाध्यक्षा कांचन पांढरे यांनी केले.

अंगणवाडी केंद्रांचे थकीत आणि सुधारित भाडे मिळावे, सीबीसी कामांची थकीत रक्कम अदा करावी, निकृष्ट पीएचआर बंद करावा, बालकांना चांगला दर्जेदार आहार द्यावा. पालकांकडून ओटीपी घेऊ नये, पूर्वीप्रमाणे सह्या घ्याव्यात, कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युईटीचा प्रस्ताव शासनाच्या अर्थ विभागात प्रलंबित आहे. हा प्रस्ताव त्वरित मंजूर करून त्याचा लाभ मिळावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रेकर ॲपचे प्रशिक्षण द्यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामाबद्दल प्रत्येकी ५० रुपये त्वरित जमा करावेत आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर त्यांचे रुपांतर सभेत झाले. यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतीने शासनाच्या विरोधात ‘हल्लाबोल’ केला.

Story img Loader