अलिबाग – विजयादशमीला शस्त्र पुजन केले जाते. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या वारसांनीही ही शस्त्र पुजनाची पंरपरा जोपासली आहे. यंदाही दसऱ्याच्या दिवशी आंग्रे घराण्याच्या शस्त्रांची विधीवत पुजा करण्यात आली.

दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या घराण्यात आजही पूर्वापार शस्त्रपूजन विजयादशमी दिवशी केले जाते. सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे हे यांनी आजही शस्त्रपूजन परंपरा जोपासली आहे. मराठा आरमाराचे प्रमुख असलेल्या कान्होजी आंग्रे यांनी कोकण किनारपट्टीचे परकीय आक्रमणांपासून संरक्षण केले. सागरावर निर्विवाद वर्चस्व त्यांनी राखले. सागरी सीमा सुरक्षित रहाव्या यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यासाठी अनेक लढाया त्यांनी केल्या. यावेळी आंग्रे यांनी वापरलेल्या आयुधांची त्यांच्या वारसांनी जोपासना केली आहे. विजयादशमीच्या निमित्ताने त्यांचे दरवर्षी पुजन केले जाते.

हेही वाचा >>>नारायणगडावरील दसऱ्या मेळाव्यावरून धनंजय मुंडेंची मनोज जरांगेंवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले, “नवीन मेळावा सुरु करून…”

यात प्रामुख्याने सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पाच किलो वजनाच्या तलवारीचा आणि ढालीचा समावेश आहे. याशिवाय भाले, गुप्ती, बंदूक आदि वापरलेली युद्धातील शस्त्र, कसरत करायचे मुदगल याचाही समावेश आहे. विजयादशमीला आंग्रे घराण्याच्या या शस्त्रांचे  घेरिया या निवासस्थानी यथासांग पूजन केले जाते.