अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांचा ताफा बुधवारी लोणार तालुक्यातील शारा येथे संतप्त शेतकऱ्यांनी अडवून त्यांच्या वाहनावर गवताच्या पेंढय़ा भिरकावल्याने मुख्यमंत्र्यांना हा दौरा आटोपता घ्यावा लागला.
विदर्भात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांची विविध पिके नष्ट झाली आहेत. बुलढाणा जिल्ह्य़ाच्या संग्रामपूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्याही केली, तर लोणार तालुक्यातील एका शेतकऱ्याचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. शेतकऱ्यांना सरकारने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत असल्याने बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठवाडय़ासह विदर्भाचा दौरा केला. लोणार तालुक्यातील शारा येथे दुपारी १२ वाजताच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांचा ताफा पोहोचला. शारा येथील अरिवद डव्हळे यांच्या शेतात जाऊन गारपिटीमुळे झालेल्या हानीची पाहणी त्यांनी केली. मात्र, आचारसंहितेचे कारण सांगून नुकसानभरपाईबाबत बोलण्याचे त्यांनी यावेळी टाळले. त्यानंतर पुढे जात असताना संतप्त शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवून जोरदार घोषणाबाजी केली. काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर गवताच्या पेंढय़ा भिरकावल्या. सुरक्षा दलाने जमावाला शांत करून मुख्यमंत्र्यांचा ताफा लोणारकडे वळविला.
लोणार तालुक्यात पिंपळखुटा, शारा, गायखेड शिवार, वेणी, गुंधा, पहूर या परिसरात मोठय़ा प्रमाणात गारपीट झाली. सर्वाधिक नुकसान पहूर येथे झाले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी तेथेही जाण्याचे टाळले. पहूर व नियोजित ठिकाणी दौरा न करताच त्यांनी थेट हेलिकॉप्टरने पुढे जाणे पसंत केले.
गारपीटग्रस्तांसाठी आज घोषणा
आधी चक्रीवादळ, नंतर पाऊस व गारपीट, असे तिहेरी संकट प्रथमच एकाच वेळी राज्यावर आलेले आहे. गारपीटग्रस्तांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून उद्या, गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीत मदतीची घोषणा करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रिसोड तालुक्यातील वाडीवाकद येथे दिली.
गारपीटग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या
धुळे : पिके उद्ध्वस्त झाल्याने तालुक्यातील कापडणे येथे एका युवा शेतकऱ्याने शेतातच विष पिऊन आत्महत्या केली. कापडणे येथील सतीश उर्फ लोटन भावराव पाटील (३५) या शेतकऱ्याने शेतीत लावलेले टोमॅटो, मेथी आणि कोथिंबीर हे पीक उद्ध्वस्त झाले. पीक काढणीला आले असताना नुकसान झाल्याने धक्का बसलेल्या पाटील यांनी बुधवारी सकाळी शेतात विष पिऊन आत्महत्या केली. पीक हातातून गेल्यामुळे कर्ज फेडता येणे अशक्य असल्याची जाणीव झाल्यानेच पाटील यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.