अमरावती : आईला मारहाण केल्याचा राग मनात धरून मुलाने वडिलांची फावडय़ाने वार करून हत्या केल्याची घटना पोलीस तपासात उघड झाली आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने वडिलांचा अंत्यविधीही उरकला. ही बाब दर्यापूर पोलीस व गावचे पोलीस पाटील यांनी केलेल्या चौकशीत समोर आली. गजानन शंकर घावट (६२), असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी आरोपी मनोज गजानन घावट (२९, रा. शिंगणवाडी) याला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
२९ जानेवारी रोजी रात्री गजानन घावट हे मद्यधूंद अवस्थेत घरी आले. यावेळी त्यांचा पत्नी चित्रकला यांच्यासोबत वाद झाला. या वादात गजानन घावट यांनी पत्नी चित्रकला यांना ढकलून दिले. खाली पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. या प्रकाराने मनोज चांगलाच संतापला.
या घटनेचा राग मनात धरून त्याने वडील गजानन यांच्यावर फावडय़ाने हल्ला चढवला. यामध्ये गजानन घावट गंभीर जखमी झाले. त्यानंतर मनोजने आई चित्रकला यांना रुग्णालयात नेले, तर गावकऱ्यांनी गंभीर जखमी गजानन घावट यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, ३० डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ३१ डिसेंबरला गजानन घावट यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर दर्यापूर पोलिसांनी चौकशी आरंभली. गावचे पोलीस पाटील प्रवीण राधाकृष्ण ठाकरे (३४) यांनीही या घटनेची माहिती गोळा केली. मुलगा मनोजनेच वडील गजानन यांची फावडय़ाने हल्ला चढवून हत्या केल्याचे चौकशीत समोर आल्यानंतर पोलीस पाटील प्रवीण ठाकरे यांनी दर्यापूर पोलीस ठाण्यात ५ जानेवारीला रात्री तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मनोज घावट याला अटक केली.