खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतासाठी पैशाचे वाटप करण्यात आल्याचा आरोप विट्याचे माजी नगराध्यक्ष अॅड.वैभव पाटील यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत केला. निवडणूक झालेल्या ४५ पैकी १७ ग्रामपंचायतीमध्ये आमच्या विचाराचे प्रतिनिधी निवडून आल्याचाही दावा त्यांनी केला.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमदार व आमदार पुत्रांनी ठिय्या मारून गावपातळीवरील राजकारणात लक्ष घातले असल्याचे सांगून अॅड. पाटील म्हणाले, आ.बाबर गटाने ४५ पैकी ३७ ग्रामपंचायती आमच्या गटाने जिंकल्या असल्याचा केलेला दावा खोटा असून अविरोध निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी या नात्याने भेटीसाठी गेलेले सदस्य आपलेच या भूमिकेतून हा दावा करण्यात आला आहे.
या निवडणुकीमध्ये आमदार गटाकडून साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर तर केलाच आहे, याचबरोबर प्रशासकीय यंत्रणेचाही सत्तेच्या माध्यमातून वापर करण्यात आला. एकेका मतासाठी पाच ते दहा हजार रूपये मोजण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना मोकळीक दिली तरच नवे नेतृत्व उभे राहू शकते, मात्र आमदार गटाने स्थानिक पातळीवर लक्ष घालून नवनेतृत्वालाच खीळ घालण्याचे प्रयत्न केले आहेत असेही त्यांनी सांगितले.