राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे संजय पवार यांचा भाजपाचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे. तसेच या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ. अनिल बोंडे यांचादेखील विजय झाला. या विजयानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले आहे. “यालाच म्हणतात जोर का झटका धीरेसे लगे. धक्का लागल्यानंतरही विचारलं तर शरद पवार म्हणतील लागलं नाही. ही तर पहिलीच वेळ आहे. पुढे वीस तारीख आहे. त्याच्यानंतरही पुढचा काळ आहे. त्यांना धक्क्यावर धक्के सहन करावेच लागणार आहे. तेव्हादेखील त्यांनी म्हणावं की काही लागलं नाही,” असे अनिल बोंडे म्हणाले.
हेही वाचा >> राज्यसभा निवडणूक निकालांनंतर संभाजीराजे छत्रपतींचं सूचक ट्वीट, तुकाराम महाराजांच्या अभंगातील ‘या’ ओळींचा उल्लेख!
तसेच पुढे बोलताना हे सरकार लवकरच पडणार असा दावा भाजपाकडून केला जातो. यावरदेखील बोंडे यांनी भाष्य केलं. “देवेंद्र फडणवीस यांनी अनेकवेळा सांगितलंय की हे सरकार कधी पडेल याचा मुहूर्त सांगू नये. हे सरकार आपापसातील कलहाने पडेल. जनतेला हे सरकार डोईजड झाले आहे. आमदार विटलेले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी सद्सदविवेक बुद्धीने मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. किती दिवस अपक्ष आमदार किंवा लहान पक्ष अन्याय सहन करणार,” असे अनिल बोंडे म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही. मुख्यमंत्र्यांशी आज कोणता आमदार भेटू शकतो? मंत्रीतरी भेटू शकतो का? असा सवालदेखील त्यांनी केला.
हेही वाचा >> “शिवसेना महाविकास आघाडीतील ‘ढ’ टीम असल्याचे पुन्हा सिद्ध”; राज्यसभा निवडणुकीवरुन मनसेचा टोला
राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा जिंकलेला आहे; विजय झालेला नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. या प्रतिक्रियेवरही अनिल बोंडे यांनी आपले मत व्यक्त केले असून त्यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर टीकास्त्र डागलंय. “संजय राऊत यांनी विजयाची व्याख्या पुन्हा करावी. खरं पाहिलं तर संजय राऊत आणि शिवसेना यांचा मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत विजय झाला होता, तो त्यांचा विजय नव्हताच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील हे सांगून त्यांनी आपले उमेदवार निवडणूक आणले होते. नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत त्यांनी सरकार स्थापन केलं. यावेळी कोणासोबतही युती न करता आमचे तिन्ही उमेदवार निवडून आले. त्यामुळे राऊत यांनी विजयाची व्याख्या समजून घ्यावी,” अशी टीका अनिल बोंडे यांनी केली.