राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनीच शरद पवारांच्या या राजीनाम्याच्या निर्णयाला विरोध केला. तसेच त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली. मात्र, शरद पवार राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला नाही, तर पुढे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते गुरुवारी (४ मे) टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला नाही तर? या प्रश्नावर अनिल देशमुख म्हणाले, “जर तरचा प्रश्न नाही. आम्ही आग्रह धरू. शरद पवारांनी सांगितलं आहे की, मी एकदा निर्णय घेतला आहे आणि मी निर्णय मागे घेणार नाही. असं असलं तरी आमदार, खासदार, नेते, कार्यकर्ते आम्ही सर्वजण शरद पवारच अध्यक्ष रहावेत असा प्रयत्न करत आहोत. आम्ही आशावादी आहोत आणि आम्हाला यश मिळेल.”
“जयंत पाटील नाराज आहेत का?”
“जयंत पाटील नाराज आहेत का?” या प्रश्नावरही देशमुखांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “जयंत पाटील नाराज नाहीत. माध्यमांमधूनच बातम्या येत होत्या की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक आहे. त्यांना असं वाटलं की, बैठक आहे आणि मला कसा निरोप आला नाही. त्यांचा गैरसमज झाला असेल. माध्यमांमधील बातम्या पाहून त्यांनी तशी प्रतिक्रिया दिली. मात्र, अशी कोणतीही बैठक नव्हती हे त्यांना नंतर कळलं.”
“साहजिक आहे की, ते महाराष्ट्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत आणि जर एखादी बैठक होणार असेल तर त्यांना निमंत्रण हवंच. मात्र, बैठकच नव्हती, त्यामुळे त्यांनी उपस्थित राहण्याचा प्रश्नच नव्हता,” असंही त्यांनी नमूद केलं.
हेही वाचा : महिलां कुस्तीपटुंवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “अमित शाह यांनी…”
“अचानक सर्वांना फार मोठा धक्का बसला”
शरद पवारांच्या राजीनाम्यावर बोलताना अनिल देशमुख म्हणाले, “शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे अचानक सर्वांना फार मोठा धक्का बसला. त्यांनी तो निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते हात जोडून, पाया पडून विनंती करत आहेत की, या निर्णयाचा फेरविचार करावा. तसेच शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा आणि त्यांनीच राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून राहावं.”
“…म्हणून शरद पवारांनीच राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष राहावं”
“महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर देशात शरद पवार हीच राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख आहे. महाराष्ट्राला आणि देशाला शरद पवारांची गरज आहे. त्यांच्यात देशातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची ताकद आहे. म्हणून त्यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष राहावं, असा आमचा आग्रह आहे,” असं मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं.
“नवे अध्यक्ष म्हणून कोणत्याही नावाची चर्चा नाही”
“अद्याप राष्ट्रवादी पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणत्याही नावाची चर्चा नाही. ना सुप्रिया सुळेंची चर्चा आहे, ना प्रफुल्ल पटेल, ना जयंत पाटील, ना अजित पवार यांच्या नावाची चर्चा आहे. काल कोणतीही बैठक नव्हती. आम्ही सर्व नेते त्यांना भेटायला गेलो होतो. बैठक ५ मे रोजी सकाळी ११ वाजता आहे. त्या बैठकीत चर्चा होईल. त्यात शरद पवारांनीच राष्ट्रवादीचं अध्यक्ष म्हणून रहावं असा आमचा आग्रह असणार आहे,” असंही देशमुखांनी नमूद केलं.