भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मला पक्षात येण्याची ऑफर दिली होती असा खळबळजनक दावा राष्ट्रीवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. अनिल देशमुखांच्या या दाव्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी नागपुरात काय झालं होतं, ते जर मी बोललो तर देशमुख अडचणीत येतील. त्यांचे पाय आणखी खोलात जातील,’ असे म्हणत देशमुख यांना या विषयावर न बोलण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर आता अनिल देशमुख यांनीदेखील बावनकुळे यांच्यावर पलटवार केला आहे. ते आज (१४ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >>> BBC Income Tax Raid : बीबीसी कार्यालयावरील कारवाईनंतर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “इंदिरा गांधींनी…”
म्हणूनच मला अडीच वर्षांपूर्वी मला अटक झाली होती
“वर्ध्याच्या सभेत मी अडीच वर्षांपूर्व समझोता केला असता, तर मला अटक झाली नसती, असे मी म्हणालो होतो. मी समझोता केला नाही. म्हणूनच मला अडीच वर्षांपूर्वी मला अटक झाली होती. कोणत्याही पक्षात जाण्याचा तसेच येण्याचा प्रश्न नाही, असे मी म्हणालो होतो,” असे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिले.
हेही वाचा >>> फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर ‘पहाटेच्या शपथविधी’वर संजय राऊतांचे मोठे विधान; म्हणाले “शरद पवारांनी…”
माझे त्यांना खुले आव्हान आहे की…
“चंद्रशेखर बावनकुळे यांना मी जे बोललो त्याचा संदर्भ माहिती नाही. ज्यांना विषय माहिती आहे, त्यांना बरोबर समजले असेल. चंद्रशेखर बावनकुळे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचे तोंड दाबण्याचा प्रश्न नाही. त्यांनी काय बोलायचे ते बोलावे. विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी काय घडले, हे बावनकुळे यांनी सांगावे. त्यांनी खुलेआम सांगावे, माझे त्यांना खुले आव्हान आहे,” असेही देशमुख म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
बावनकुळे म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी नागपुरात जे काही घडलं, ते मी बोललो तर देशमुख अडचणीत येतील. त्यांचे पाय आणखी खोलात जातील. त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी देशमुखांनी दावा केला आहे की, भाजपा नेते त्यांच्या मागे लागले होते, असे विचारले. यावर उत्तर देताना बावनकुळे संतापले आणि म्हणाले की, “आम्हाला अनिल देशमुखांची काहीच गरज नव्हती. पण अनिल देशमुखांना भाजपाची काय गरज होती ते आम्ही वेळ आल्यावर सांगू. माझी अनिल देशमुखांना सूचना आणि विनंती देखील आहे की, ते जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहेत याचं त्यांनी भान ठेवावं. न्यायालयाने सांगितलेल्या अटी आणि शर्थींचं पालन करावं. त्यांना न्यायालयाने क्लीन चीट दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी टोलेबाजी बंद करावी.”