Anil Deshmukh महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी देवेंद्र फडणवीस यांचं एक व्यंगचित्र पोस्ट करत त्यासह एक पोस्ट लिहिली आहे. जी चांगलीच चर्चेत आली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलेलं असताना सकाळी ८ वाजता काय गौप्यस्फोट होणार याची चर्चा रंगली आहे.

अनिल देशमुख यांचे देवेंद्र फडणवीसांवर आरोप काय?

“तीन वर्षांपूर्वी प्रतिज्ञापत्र करून खोटे आरोप आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरेंवर करण्यास मला सांगण्यात आलं. मी त्याला नकार दिल्यामुळे माझ्यावर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली”, असं अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) जुलै महिन्यांत म्हणाले होते. “तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा अत्यंत जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला. त्याने माझं देवेंद्र फडणवीसांशी अनेकदा बोलणं करून दिलं. त्यांनी माझ्याकडे एक लिफाफा पाठवला. त्यातल्या चार मुद्द्यांचं प्रतिज्ञापत्र करून देण्यास मला सांगण्यात आलं होतं. ते जर मी करून दिलं असतं तर तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार हे अडचणीत आले असते” असंही अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) म्हटलं होतं.

हे पण वाचा Anil Deshmukh : फडणवीसांनी काय ऑफर दिली होती? पार्थ पवार, आदित्य ठाकरेंना कसं अडकवायचं होतं? अनिल देशमुखांचे पुस्तकातून धक्कादायक खुलासे

चार प्रतिज्ञापत्रांमध्ये काय होतं?

१) उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी मातोश्रीवर अनिल देशमुखांना बोलवलं त्यांना पैसे गोळा करायला सांगितले या प्रतिज्ञापत्रावर सही करा.

२) दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात हा उल्लेख होता की आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. हा उल्लेख असलेल्या प्रतिज्ञापत्रावर सही मागितली.

३) तिसरं प्रतिज्ञापत्र अनिल परब यांच्याबाबत होतं, त्यांनी काही बेकायदेशीर बांधकामं आहेत त्या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र आहे त्यावर सही करा.

४) चौथ्या प्रतिज्ञापत्रात अजित पवारांचा उल्लेख होता. अजित पवारांनी देवगिरी बंगल्यावर बोलवलं. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार उपस्थित होते. त्या दोघांच्या उपस्थितीत तुम्हाला (अनिल देशमुख) सांगण्यात आलं आहे की गुटखा विक्री करणाऱ्यांकडून इतके पैसे गोळा करायला सांगितलं आहे. अशा पद्धतीचं चौथं प्रतिज्ञा पत्र होतं. या सगळ्या आरोपांची राळ उठवल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचं एक व्यंगचित्र पोस्ट करुन अनिल देशमुखांनी गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले आहेत.

काय आहे अनिल देशमुख यांची पोस्ट?

“टरबूज्या” सोबतची तुरुंगात झालेली ती खास भेट! तपशील उद्या सकाळी 8 वाजता! अशी पोस्ट अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी केली आहे.

अनिल देशमुखांनी पोस्ट केलेलं व्यंगचित्र काय?

अनिल देशमुख यांनी पोस्ट केलेल्या व्यंगचित्रात देवेंद्र फडणवीस हे हसतमुख पण दयनीय अवस्थेत दिसत आहेत. तर पुढे अर्ध कापलेलं एक टरबूज आहे आणि त्यावर उंदीर बसला आहे. आता यावरुन अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) सकाळी काय सांगणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.