राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीनं बजावलेल्या चौथ्या समन्सनंतर देखील सोमवारी चौकशीला गैरहजर राहिले. त्यामुळे अनिल देशमुख नेमके कुठे गायब झाले आहेत? असा प्रश्न ED ला पडला आहे. यासंदर्भात आता ईडीला सर्वोच्च न्यायालयाकडून आज दिल्या जाणाऱ्या आदेशांची प्रतीक्षा असून “अनिल देशमुख नेमके कुठे आहेत, याची आम्हाला माहिती नाही”, असं ईडीचं म्हणणं आहे. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नेमकी अनिल देशमुख यांची चौकशी होणार का? आणि झाली, तर ती कधी होणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. ED मधील सूत्रांच्या हवाल्याने NIA नं हे वृत्त दिलं आहे.

आम्हाला आशा आहे की आजच्या आदेशांनंतर…!

ED नं अनिल देशमुख आणि त्यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख या दोघांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. सोमवारी म्हणजेच २ ऑगस्ट रोजी त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, सोमवारी देखील अनिल देशमुख हजर न राहिल्यामुळे आता ईडीला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. “आम्ही अनिल देशमुख यांच्याशी संपर्क करण्यात असमर्थ ठरत आहोत. आम्हाला माहीत नाही की ते कुठे आहेत. त्यांचा नेमका ठावठिकाणा अज्ञात आहे. आम्हा आता आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची प्रतीक्षा करत आहोत. आम्हाला आशा आहे, की आजच्या न्यायालयाच्या आदेशांनंतर तरी अनिल देशमुख चौकशीमध्ये सहकार्य करतील”, असं ईडीकडून सांगण्यात आलं आहे.

 

अनिल देशमुख यांनी ईडीच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये जर न्यायालयाने देशमुखांची याचिका फेटाळून लावली, तर मात्र ईडीसमोर हजर होण्याशिवाय अनिल देशमुखांकडे पर्याय उरणार नाही.

Story img Loader