अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २०१९ मध्ये शरद पवारांनी भाजपाशी युती करण्याबाबत चर्चा केली होती. पण ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. तर पहाटेचा शपथविधी घेऊन अजित पवारांनी भाजपाला दिलेला शब्द पूर्ण केला, असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
छगन भुजबळ यांच्या दाव्यानंतर शरद पवार गटातील नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी छगन भुजबळांवर टीकास्र सोडलं आहे. छगन भुजबळांचा क्रिकेटशी काही संबंध नाही, त्यांना गुगली वगैरे समजत नाही, असा टोला अनिल देशमुखांनी लगावला. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
छगन भुजबळांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख म्हणाले, “राजकारणात अनेकदा गुगली बॉल टाकावा लागतो. २०१९ मध्ये आपल्या विरोधकाला बेसावध ठेवाण्यासाठी शरद पवारांनी काही गुगली बॉल टाकले. त्यामुळे भाजपा बेसावध राहिली. परिणामी महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आली. हे सर्वांना माहीत आहे.”
हेही वाचा- “पवारांमुळे राजकीय बळी कसे गेले, हे घरातील लोकच…”, शिंदे गटाच्या आमदाराचं विधान चर्चेत
“छगन भुजबळांचा क्रिकेटशी काहीही संबंध नाही. त्यांना गुगली बॉल वगैरे काही समजत नाही. त्यावेळी जी गुगली टाकली ती भारतीय जनता पार्टीच्या खरोखर लक्षात आली नाही. यामुळे भाजपा बेसावध राहिली आणि आम्ही तिघे एकत्र आलो आणि सत्ता स्थापन केली. ही वस्तुस्थिती आहे”, असंही अनिल देशमुख पुढे म्हणाले.