राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातील नेते आणि कळवा-मुंब्रा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील पक्षाच्या शिबिरात श्रीरामाबद्दल केलेल्या एका वक्तव्याने राज्यातलं राजकारण तापलं आहे. ‘राम हा मांसाहारी होता’, असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं होतं. आव्हाडांच्या या वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. तसेच आव्हाडांविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनंही झाली. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काही नेत्यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपा आणि शिंदे गट आव्हाडांवर टीका करत असताना महाविकास आघाडीतले नेते आव्हाडांच्या बचावासाठी पुढे आलेले दिसत नाहीत. केवळ काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आव्हाडांचा बचाव केला आहे. या सगळ्या प्रकारांत शरद पवार गटानेही आव्हाडांचा बचाव केला नाही.

शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी रात्री एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली. यामध्ये रोहित पवार यांनी म्हटलं होतं की, “आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे. देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय आहे. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही त्याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ… अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे!”

दरम्यान, माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटातील आमदार अनिल देशमुख यांनीदेखील जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याशी फारकत घेतली आहे. अनिल देशमुख यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, प्रभू श्रीरामचंद्र हे तमाम देशवासियांचं श्रद्धास्थान आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काल केलेलं वक्तव्य हे त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं, पक्षाचं नाही!

हे ही वाचा >> जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्याला विजय वडेट्टीवारांचा पाठिंबा; म्हणाले, “वाल्मिकी रामायणात पुरावे…”

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले होते?

“राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील पक्षाच्या शिबिरात उपस्थित केला. तसेच शिबिरानंतर माध्यमांनी आव्हाड यांना पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारल्यावर आव्हाड म्हणाले, “मी कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनवलं जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil deshmukh says jitendra awhad statement about lord ram is personal not it has nothing to do with ncp asc