ओळखपत्र मागितल्याचा राग आल्याने पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करणारे शिवसेनेचे अनिल कदम यांनी या प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्यानंतर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते.
नाशिकमधल्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, “अनिल कदम शिवसेनेचे सुसंस्कृत आणि कुटुंबवत्सल आमदार आहेत पण, जर ते या प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांचा राजीनामा मी स्वीकारेन. घडलेल्या संपुर्ण प्रकरणाची माहिती घेऊन कदम यात जर दोषी आढळले तर, मीच त्यांना राजीनामा देऊन बाजूला होण्यास सांगेन” असेही ते म्हणाले.  “आतापर्यंत या टोल नाक्यांच्या प्रश्नावरून अनेक वेळा अनेकांनी आंदोलने केली आहेत. त्यामुळे प्रत्येकाची काहीतरी सहनक्षमता असते. त्यामुळे अनिल कदमांना असे वर्तन का करावे लागले? याची खरी पार्श्वभूमीही लक्षात घेतली पाहिजे. परंतु, त्यांनी महिला कर्मचाऱ्यांबरोबर जी भाषा वापरली त्याच्या विरोधात शिवसेना आहे. त्यांनी अशी अर्वाच्च्य भाषा वापरता कामा नये” असेही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
एकंदर उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरून शिवसेना पक्ष अनिल कदम यांच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे.
 
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आता पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात आमदार अनिल कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला कर्मचाऱयांना शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणाचा गुन्हा आमदार कदम यांच्यावर नोंदविण्यात आला आहे. परंतु अद्यापही त्यांना अटक झालेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil kadam cultured and family affectionate leader uddhav thackeray