Anil Parab on Disha Salian Murder Case: दिशा सालियन हत्या प्रकरणावरून आज विधानसभा व विधानपरिषद अशा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये तुफान खडाजंगी झाली. यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब या प्रकरणावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मनीषा कायंदे यांनी आदित्य ठाकरेंबाबत केलेली एक जुनी सोशल मिडिया पोस्टदेखील त्यांनी सभागृहात वाचून दाखवत मनीषा कायंदे यांच्या वर्तनाला सरड्याची उपमा दिल्यानंतर सभागृहात गदारोळ झाला.
दिशा सालियनच्या वडिलांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून दिशाची हत्या झाल्याचा दावा त्यात केला आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जावी, सुनावणी दुसऱ्या राज्यात घेण्यात यावी अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत. १४व्या मजल्यावरून पडल्यानंतरही दिशाच्या शरीरावर एकही जखम कशी झाली नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे.
काय म्हणाले अनिल परब?
दरम्यान, अनिल परब यांनी या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या सत्ताधाऱ्यांना विधानपरिषदेत लक्ष्य केलं. “आदित्य ठाकरेंची केस न्यायालयात गेल्या ५ वर्षांपासून चालू आहे. यात सीबीआय, सीआयडी, एसआयटीची चौकशी झाली. दीड वर्षांपासून एसआयटीच्या चौकशीचा अहवाल का सभागृहात मांडला नाही? एसआयटीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. तुम्ही फक्त शिळ्या कढीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून हे सगळं करता काय?” असं अनिल परब यावेळी म्हणाले.
“औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पूर्णपणे चेपून टाकली. आज दुसरा विषय नाही. आदित्य ठाकरेंची चौकशी करायला माझी काहीच हरकत नाही. पण या प्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्याने याचिका केली होती. १७ फेब्रुवारीची त्याची सुनावणी पुढे ढकलली. काल जी याचिका दाखल झाली, ती याचिका आधीच्या याचिकेसोबत वर्ग करावी अशी मागणी केली आहे. ही कॉपी-पेस्ट याचिका आहे. हे कोण करतंय हे न कळण्याइतके आम्ही मूर्ख आहोत का? हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का? कोर्ट देईल ना काय निर्णय द्यायचाय तो. कोर्टाचा तो अधिकार आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना तुम्ही कसं ते ठरवणार?” असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.
मनीषा कायंदेंवर अनिल परबांचं टीकास्र
दरम्यान, यावेळी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या आमदा मनीषा कायंदे यांच्यावर अनिल परब यांनी हल्लाबोल केला. “आदित्य ठाकरेंबाबत ज्या मनीषा कायंदेंनी हा प्रस्ताव आणला त्यांनी आदित्य ठाकरेंना सीबीआयनं क्लीनचिट दिली तेव्हा ट्वीट केलं होतं. ‘सत्य परेशान हो सकता है, परेशान नहीं याची प्रचिती देशवासीयांना आली आहे. दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाल्याचं सीबीआयच्या अहवालात उघड झालं आहे. पण भाजपा व राणे गँगने त्याचा बादरायण संबंध सोडून थयथयाट केला. आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरेंची माफी मागावी’, असं ट्वीट त्यांनी केलं होतं”, असं म्हणत अनिल परब यांनी ती पोस्ट वाचून दाखवली.
“पण मनीषा कायंदेंनी सरड्यापेक्षा वेगाने रंग बदललाय. आता त्यांचं उपसभापतीच्या पदावर लक्ष आहे. वरीष्ठांना खूश करण्यासाठी हे असे आरोप केले जात आहेत. हे सगळं पाहून सरडाही लाजला. एक सरडा माझ्या घरासमोरून आज जात होता, लाजून लांब पळाला. हे काय चाललंय सभागृहात? आदित्य ठाकरेंचा या प्रकरणाशी जो काही संबंध असेल, त्याची काळजी न्यायालय घेईल. एसआयटी अहवाल सादर केला नाही त्यावर कारवाई केली पाहिजे”, असं अनिल परब म्हणाले.
“विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला…”
“संजय राठोड, जयकुमार गोरे यांच्या प्रकरणावर सत्ताधारी बोलत नाहीत. त्यांचे एवढे आक्षेपार्ह फोटो सभागृहात आले, त्यावर कुणी काही बोलत नाही. फक्त ठरवून हे सगळं केलं जातंय का? विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याल कसाही दाबायचा का? तुमचं सगळं कारभाराचं अपयश लपावं म्हणून तुम्ही हे सगळं करताय का? किरीट सोमय्यांची पत्नी आत्महत्या करायला चालली होती. इथे त्यांचे व्हिडीओ सादर केले. त्याची चौकशी का नाही झाली?” असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.