रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनारी उभे राहिलेल्या साई रिसॉर्टवर आज ( २२ नोव्हेंबर ) हातोडा पडणार असल्याचं समोर आलं होतं. प्रशासनाकडून तशी तयारीही करण्यात आली होती. पण, याला आता न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. हे रिसॉर्ट शिवसेना नेते अनिल परब यांचा असल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमैय्यांनी केला होता. मात्र, हा आरोप अनिल परब यांनी फेटाळला आहे. माझा या रिसॉर्टशी संबध नाही, अशी स्पष्टोक्ती परब यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अनिल परब म्हणाले, “जाणूनबुजून त्रास देणे, ठाकरे सरकार असताना प्रतिमा मलिन करणे, हाच किरीट सोमय्यांचा उद्देश होता. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांवर किरीट सोमय्या बोलत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात २०६० घरे आणि रिसॉर्ट अनधिकृत आहेत. या रिसॉर्टला सरकारने परवानगी दिली होती. परवानगी चुकीची असेल तर मालकाचा दोष किती हे तपासावे लागेल. याच रिसॉर्टवर कारवाई होत असेल, तर बाकीच्यांना देखील हा कायदा लागू होतो.”
“सुपारी घेऊन किरीट सोमय्या काम करतात”
किरीट सोमय्या अधिकाऱ्यांच्या आधी हातोडा घेऊन पोहचतात, असा प्रश्न विचारल्यावर परब यांनी सांगितलं, “ही किरीट सोमय्यांची नौटंकी आहे. त्यांनी नारायण राणे आणि सुभाष देशमुख यांच्या अनधिृकत घरांवर हातोडा घेऊन जावावे. कोणाची घरे अनधिकृत आहेत, याची यादी आमच्याकडे आहे. मला अडकवण्यासाठी सर्व सुरु आहे. सुपारी घेऊन किरीट सोमय्या काम करतात. शिंदे गटात गेलेल्यांबद्दल बोलण्याची सोमय्यांची हिंमत आहे का? असेल तर दाखवावी,” असे आव्हान परब यांनी दिलं आहे.
“न्यायालयाचा अपमान माध्यमं करत आहेत”
“याप्रकरणी अब्रुनूकसानीचा दावा दाखल केला आहे. आता फौजदारी दावाही दाखल करणार आहे. माझा रिसॉर्टशी संबंध नाही, हजारवेळ सांगितलं आहे. पाडकामाबाबत न्यायालयाचे स्थगितीचे आदेश असताना देखील अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडणार या बातम्या माध्यमांत दाखवल्या जात आहेत. न्यायालयाचा अपमान माध्यमं करत आहेत. किरीट सोमय्यांनी उल्लेख केला म्हणजे ते ब्रम्हदेव नाही. माध्यमांनी शहानिशा करुन बातम्या चालवाव्यात,” असे आवाहनही अनिल परब यांनी केलं आहे.