शिवसेनेचा ( ठाकरे गट ) दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटातून मुंबईत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार अनिल परब यांनी शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे.
“शिंदे गटानं मेळाव्याच्या माध्यमातून ताकद दाखवावी. शिवसेनेची खरी ताकद आम्ही दाखवू. ताकदच बघायची असेल, तर निवडणुका घ्या,” असं विधान अनिल परबांनी केलं आहे. ते शिवसेना भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा : “हलक्या मनाचे, कुचक्या वृत्तीचे, आतल्या गाठीचे अन्…”, शिंदे गटातील नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका
अनिल परब म्हणाले, “आझाद मैदानावर ‘इव्हेंट’ होणार आहे. तर, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा पार पडणार आहे. आमच्या दसरा मेळाव्याला परंपरा आहे. शिवसेना स्थापनेपासून ठाकरे घराण्याची ही परंपरा आहे. प्रत्येकवर्षी ही गर्दी वाढत आहे. त्यामुळे यंदा किती वाढेल? हे आता सांगणं कठीण आहे.”
“शिवसेना ही मर्दांची सेना असल्याचं बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलं होतं. मर्द गद्दारांबरोबर गेले नाहीत. कुठल्याही यंत्रणेसमोर झुकले नाहीत. ज्यांनी सगळी आमिषे फेटाळून लावली, अशांचा हा मेळावा आहे,” असं अनिल परबांनी सांगितलं.
हेही वाचा : “…म्हणून नारायण राणे मराठा आरक्षणाचा विषय भरकवटण्याचा प्रयत्न करत आहेत”, सुजात आंबेडकरांचं विधान
“शिंदे गटाला मेळावा घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी त्यांची ताकद दाखवावी. शिवसेनेची खरी ताकद आम्ही दाखवू. ताकदच बघायची असेल, तर निवडणुका घ्या… काय ते एकदा ताकद दाखवा,” असं आव्हान अनिल परबांनी शिंदे गटाला दिलं आहे.