राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांची बाजू मुंबई उच्च न्यायालयात मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या जीवाला धोका असल्याच्या चर्चेवर उत्तर दिलं आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या जीवाला धोका आहे या हवेतल्या गोष्टी असल्याचं मत अनिल परब यांनी व्यक्त केलं. तसेच त्यांच्या जीवाला धोका असेल, तर त्यांनी रितसर पोलीस संरक्षण मागावं, असंही नमूद केलं.
अनिल परब म्हणाले, “गुणरत्न सदावर्ते यांच्या जीवाला धोका या हवेतल्या गोष्टी आहेत. त्यांच्या जर जीवाला धोका असेल, तर त्यांनी रितसर पोलीस संरक्षण मागावं. शासन त्यांना संरक्षण देईल. कोणाच्याही जीवाला धोका करण्याची इच्छा नाहीये”
“एसटी कामगारांना चारवेळा संधी दिली, त्यामुळे आता कारवाई मागे नाही”
अनिल परब म्हणाले, “आम्ही आमच्याकडून २ नाही, तर ४ पावलं पुढे गेलो. मी एस. टी. कामगारांवर कारवाई होणार नाही यासाठी चारवेळा संधी दिली होती. याबाबतीत वेळोवेळी आवाहन करूनही एसटी कामगार कामावर परतले नव्हते. आता कर्मचाऱ्यांनी अगोदर कामावर रुजू व्हावं त्यानंतर कोणाशीही बोलणी करायला सरकार तयार आहे.”
हेही वाचा : अनिल परबांच्या आवाहनानंतर राज्यात १९ हजार एसटी कर्मचारी कामावर परतले!
“ज्या एसटी कामगारांवर आता कारवाई करण्यात आलेली आहे ती माघारी घेण्यात येणार नाही. दिवाळीच्या अगोदर आत्तापर्यंत सरकारनं ५० एसटी कर्मचाऱ्यांच्या गटांना भेटी दिल्या आहेत. २८ युनियनच्या कृती समितीबरोबर करारही केला आणि बाकीच्या मागण्या मान्य केल्या. यानंतरही ते आंदोलन मागे घेत नाहीत याचा अर्थ एसटी कामगारांचे आंदोलन चुकीच्या दिशेने भरकटत चाललं आहे,” असं अनिल परब यांनी सांगितलं.