मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी भाजापाने विशेष रणनीती आखली आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून मुंबईमध्ये ‘जागर मुंबई’चा या मोहिमेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेण्यात येणार आहेत. या मोहिमेतील पहिला सभा आज (६ नोव्हेंबर) मुंबईच्या वांद्रे पूर्व येथे आयोजित करण्यात आली. या सभेनंतर भाजपाने पालिका निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात मातोश्रीच्या अंगणापासून केल्याच भावना व्यक्त केली जात आहे. असे असतानाच उद्धव ठाकरे गटातील नेते अनिल परब यांनी भाजपाच्या जागर मुंबईचा या मोहिमेवर भाष्य केले आहे. मातोश्री शिवसैनिकांसाठी देऊळ आहे. या देवळाच्या बाहेर कितीजरी तमाशा केला, तरी देवाला काहीही फरक पडत नाही, असे परब म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा >> “लातूरकर, नांदेडकर फडणवीसांच्या मांडीवर बसायला तयार,” प्रकाश आंबेडकरांची टीका; नाना पटोले म्हणाले “भाजपाचे प्रवक्ते…”
मातोश्रीच्या अंगणात यापूर्वीही वेगवेगळे प्रयोग करण्यात आलेले आहेत. मात्र हे सर्व प्रयोग अयशस्वी झालेले आहेत. जो कोणी विरोधात येतो, त्याची पहिली नौटंकी ही अगोदर मातोश्रीच्या अंगणात असते. याच कारणामुळे आम्हाला त्याची सवय झालेली आहे. भाजपाच्या अशा कार्यक्रमामुळे मातोश्रीवर काहीही परिणाम होणार नाही, असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >> सत्तेत आल्यास ‘समान नागरी कायदा’ लागू करू, हिमाचल प्रदेशच्या जनतेला भाजपाचे मोठे आश्वासन
मातोश्री हा बंगला शिवसेनेसाठी वर्षानुवर्षे देऊळ आहे. देवळाच्या समोर कोणी तमाशा केला, तर देवळातील देवाला काहीही फरक पडत नाही. कोणी काय कारावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यांनी मातोश्रीच्या अंगणात कार्यक्रम घेतला. आम्हाला त्यावर आक्षेप नाही. निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना काय आहे, हे आम्ही दाखवून देऊ, असेदेखील परब म्हणाले.
हेही वाचा >> ‘हर हर महादेव,’ ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटांविरोधात रस्त्यावर उतरणार का? संभाजीराजे म्हणाले, “मी तर…”
भाजपाची ‘जागर मुंबईचा’ ही मोहीम काय आहे?
भाजपाचे नेते तथा भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाजपाच्या या विशेष मोहिमेबद्दल माहिती दिलेली आहे. ‘मतांसाठी तुष्टीकरण सुरू आहे. महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. औरंगजेबी स्वप्न पाहणाऱ्यांची भलती ‘उठा’ठेव सुरु आहे. त्याविरोधात भाजपाकडून मुंबईकरांसाठी ‘जागर मुंबईचा’ ही मोहीम राबवली जाणार आहे,’ अशी माहिती आशिष शेलार यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिलेली आहे.