गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार अनिल परब यांना दिलासा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अनिल परब यांनीच ही माहिती दिली आहे. “राष्ट्रीय हरिद लवादाकडे साई रिसॉर्टचे प्रकरण सुनावणीस गेले असता, त्यांनी बरखास्त केलं आहे,” असं अनिल परब यांनी सांगितलं.
नेमकं काय म्हणाले अनिल परब?
“दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी आमची चौकशी केली. गेली दीड वर्षे माझी नाहक बदनामी करण्यात आली. याप्रकरणात तथ्य नसल्याचं सुरुवातीपासून सांगतोय. सोमय्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटे आरोप करत आहेत. राष्ट्रीय हरित लवादात हे प्रकरण सुनावणीला आलं, तेव्हा या प्रकरणात काही तथ्य नाही. आम्ही हे प्रकरण बरखास्त करत आहोत, असं न्यायमूर्तींना सांगितलं. तेव्हा आपली अब्रू जाईल या भितीने किरीट सोमय्यांनी ही याचिका मागे घेतली,” असं टीकास्र अनिल परबांनी डागलं आहे.
“किरीट सोमय्यांना एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल. अथवा १०० कोटींचा दावा केलाय, ते द्यावे लागतील,” असंही अनिल परब म्हणाले.
हेही वाचा : खडसे यांच्या स्वार्थीपणामुळेच जावई विनाकारण तुरुंगात; गिरीश महाजन यांचा आरोप
“सदानंद कदम तीन महिने जेलमध्ये, तर अनिल परब…”
यावर किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते ‘टिव्ही ९ मराठी’शी बोलत होते. “आर्धे रिसॉर्ट पाडण्यात आलं आहे. राहिलेलंही पाडण्यात येणार आहे. एक जेलमध्ये आहे. दुसरा बेलवर आहे. सदानंद कदम तीन महिने झालं जेलमध्ये आहेत. तर, अनिल परब तीन जामीनावर आहेत. हिशोब तर घेणारच,” असा इशारा किरीट सोमय्यांनी दिली आहे.
“जो जेल आणि जामीनाच्यामध्ये आहे, त्याने…”
“अनिल परब उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले तरीही खर्च केलेले साडेदहा कोटी रुपये कुठून आले, याचं उत्तर द्यावं लागणार आहे. आयकर विभागाने अनिल परब यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल केले आहेत. परब निर्दोष आहेत, तर जामीनावर का सुटले?जेलमध्ये राहून सत्याग्रह करायचा होता. जो जेल आणि जामीनाच्यामध्ये आहे, त्याने निर्दोष असल्याचं सांगू नये,” असा टोला सोमय्यांनी परबांना लगावला आहे.
“रिसॉर्ट अनिल परबांनी बांधला असून…”
“परबांनी समुद्राची जागा बळकावली होती. रिसॉर्ट प्रकरणीच सदानंद कदम जेलमध्ये आहेत. निर्दोष असते, तर जेलमध्ये का घातलं? तात्पुरती कारवाई होऊ नये म्हणून न्यायालयात का गेलात? अजून तर हिशोब व्हायचा आहे. रिसॉर्ट अनिल परबांनी बांधला असून, त्यांच्याकडून विकत घेतला आहे, असं सदानंद कदम यांनी सांगितलं आहे. अनिल परबांनी चोरी, लबाडी आणि अनधिकृत काम केली आहेत. त्यांचे सहकारी जेलमध्ये आहेत, मग हे बाहेर कसं राहू शकतील. हे सध्या जामीनावर आहेत. काही दिवसांचा दिलासा,” असा सूचक इशाराही किरीट सोमय्यांनी दिला आहे.