गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. आता १० जानेवारीला आमदार अपात्रता प्रकरणी निकाल लागणार आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार अनिल परब यांनी भाष्य केलं आहे. “आम्हाला अपात्र केलं, तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ”, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधत होते.
अनिल परब म्हणाले, “गेली दीड वर्षे सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात अपात्रता प्रकरणावर सविस्तर युक्तिवाद झाल्यानंतर निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला होता.”
“आम्हाला निर्णयाची अपेक्षा आहे, कारण…”
“सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या चौकटीत अध्यक्षांनी अपात्रतेचं प्रकरण ऐकलं. त्याप्रमाणे आम्ही आमची बाजू अध्यक्षांसमोर मांडली. यावेळी व्हीप कुणाचा? पक्ष कुणाचा? पक्षात फूट पडली का नाही? या गोष्टींवर मांडणी झाली आहे. आम्हाला निर्णयाची अपेक्षा आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय की, ‘विधानसभा अध्यक्षांचा निर्णय जो लागेल, त्यावर पुढे योग्य ती कारवाई करू,'” असं अनिल परबांनी म्हटलं.
हेही वाचा : “…तेव्हा मी ठाम होतो”, आमदार अपात्रतेवर नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य; म्हणाले, “मी महाविकास आघाडीत…”
“आम्हाला अपात्र केलं, तर…”
“अपात्र कुणाला करायचं नाही करायचं हा अधिकार अध्यक्षांना आहे. अध्यक्ष कुणाला अपात्र करतात, याची वाट पाहतोय. कारण, विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा युक्तिवाद होईल. कदाचित आमदारांना अपात्र केलं, तर शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाईल. आम्हाला अपात्र केलं, तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. याचा अर्थ हे प्रकरण इथेच संपत नाही. निकाल कसा आणि कशाच्या आधारावर देतात हे पाहणं महत्वाचं आहे. विधानसभा अध्यक्षांनी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निकाल देऊ नये,” असा टोला अनिल परबांनी राहुल नार्वेकरांना लगावला आहे.