मूळ ‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह नेमकं कुणाचं? याबाबतची सुनावणी आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पार पडली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोन्ही गटाकडून शिवसेना पक्षावर दावा सांगण्यात आला. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणूक आयोगानं ३० जानेवारीपर्यंत लेखी उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
निवडणूक आयोगासमोरील सुनावणीनंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीबाबत मोठा खुलासा केला आहे. शिंदे गटाची प्रतिनिधी सभा बोगस असून त्यांचे ७८ विभागप्रमुख घटनाबाह्य आहेत, अशी माहिती परब यांनी दिली.
निवडणूक आयोगासमोरील सुनावणीबाबत अधिक माहिती देताना अनिल परब म्हणाले, “शिंदे गटाने जी याचिका दाखल केली होती, त्यातील सगळे मुद्दे खोडून काढले आहेत. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. केवळ आमदार किंवा खासदार म्हणजे पक्ष नसतो. पक्ष म्हणजे राष्ट्रीय कार्यकारणी असते. याचं बहुमत आमच्याकडे आहे. याचा खुलासा दोन्ही वकिलांनी केला.”
सादिक अली खटला गैरलागू- अनिल परब
“शिंदे गटाने सादिक अली खटल्याच्या अधारावर याचिका दाखल केली होती. पण ज्यावेळी दोन्ही बाजू समान असतात. तेव्हा दोन्ही बाजुंचे लोकप्रतिनिधी मोजले जातात. असं सादिक अली केसमध्ये केलं होतं. पण इथे परिस्थिती तशी नाहीये. इथे पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणीचे सर्व प्रतिनिधी बहुसंख्येनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे हा खटला येथे लागू होऊ शकत नाही. अशी मांडणी निवडणूक आयोगासमोर करण्यात आली,” अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
हेही वाचा- शिवसेना कुणाची? ठाकरे की शिंदे? निवडणूक आयोगाने दिली पुढची तारीख, आता द्यावं लागणार लेखी उत्तर!
“शिंदे गटाच्या याचिकेत जे मुद्दे होते, ते सगळे मुद्दे खोडून काढले आहेत. याचिकेतील त्रुटी, शिवसेनेच्या घटनेत केलेली दुरुस्ती, घटनेची केलेली मोडतोड या सर्व बाबी निवडणूक आयोगासमोर आणल्या आहेत. त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव आम्हालाच मिळेल,” असंही परब म्हणाले.
शिंदे गटाची प्रतिनिधी सभा बोगस- अनिल परब
“आमची प्रतिनिधी सभा कायद्याच्या आधारे झाली आहे. त्यांनी घेतलेली प्रतिनिधी सभा बोगस आहे. असा युक्तिवाद कपील सिब्बल यांनी केला. प्रतिनिधी सभेत कोण-कोण असायला हवं? याचा उल्लेख शिवसेनेच्या घटनेत आहे. त्यानुसार मुंबईचे विभागप्रमुख हेच प्रतिनिधी सभेचे सदस्य असतात. पण शिंदे गटाने ७८ विभागप्रमुख दाखवले आहेत, हे विभागप्रमुख जळगाव, धुळे नंदुरबारचे आहेत. त्यामुळे हे विभागप्रमुख शिवसेनेच्या घटनेचा भागच नाहीयेत. त्यांनी घटनेची मोडतोड करून प्रतिनिधी सभा दाखवली आहे. ही चुकीची आहे, असा युक्तिवाद सिब्बल यांनी आयोगासमोर केला,” अशी माहिती परब यांनी दिली.