शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीने २७ मे रोजी छापेमारी केली. ईडीने मुंबईसह पुणे आणि रत्नागिरी अशा एकूण सात ठिकाणी छापे टाकले होते. अनिल परब यांना दापोलीमधील जमीन विकणाऱ्या विभास साठेंच्या कोथरुडमधील घरावरही छापा टाकण्यात आला होता.. दरम्यान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी विभास साठेंचा मनसुख हिरेन होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली होती. याबाबत आता अनिल परब यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना याबाबत भाष्य केले आहे.
“मी किरीट सोमय्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही. किरीट सोमय्या म्हणजे कोणतीही तपास यंत्रणा नाही. त्यांना तक्रार करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी त्या केल्या आहेत. ज्या यंत्रणा मला प्रश्न विचारतील त्यांना उत्तर द्यायला मी बांधिल आहे. त्यांनी यापुढेही प्रश्न विचारले तर मी उत्तरे देईन,” असे अनिल परब म्हणाले.
“विभास साठे यांची जमिन मी खरेदी केली आणि नंतर विकली. माझा व्यवहार अतिशय पारदर्शक आहे. ज्यांनी रिसॉर्ट बांधलं त्यांनी त्याची जबाबदारी घेतलेली आहे. सर्व कागदपत्रे तपास यंत्रणांना देण्यात आली आहेत. यापूर्वीही ईडीची चौकशी झालेली आहे. पुन्हा एकदा शिळ्या कढीला उत आणून बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही किरीट सोमय्यांनी आम्ही उत्तर देणार नाही. यंत्रणा चौकशी करेल आणि त्यातून सत्य बाहेर येईल,” असेही अनिल परब म्हणाले.
“ज्यावेळी जेलमध्ये जायची वेळ येईल तेव्हा कुठून कसा जाणार ते सांगतो. किरीट सोमय्यांना जिथे योग्य वाटेल तिथे तक्रार द्यावी. त्याची दखल सरकार घेईल,” असे अनिल परब म्हणाले.