राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षांनी एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्याची एकही संधी सोडली नाही असं चित्र नागपूर विधिमंडळ परिसरात दिसून आलं. विरोधकांनी शेवटच्या दिवशी सरकारला आक्रमकपणे विविध मुद्द्यांवर प्रश्न केले, तर दुसरीकडे सरकारकडूनही या प्रश्नांना व टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलं. या पार्श्वभूमीवर अधिवेशनात वेगवेगळे मुद्दे चर्चेला येत असताना चक्क गौतमी पाटीलचाही उल्लेख आज विधानपरिषदेत झाला. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मांडताना गौतमी पाटीलचा उल्लेख केला आणि सभागृहात हास्याची लकेर उमटली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं घडलं काय?

विधान परिषदेमध्ये राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर चर्चा चालू असताना विरोधकांकडून वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले जात होते. विधानपरिषदेतील शरद पवार गटाचे ज्येष्ठ सदस्य एकनाथ खडसे यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार व माजी परिवहन मंत्री अनिल परब भाषणासाठी उभे राहिले. अनिल परब यांनी यावेळी भाषणाची सुरुवातच गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांच्या उल्लेखाने केली!

काय म्हणाले अनिल परब?

अनिल परब यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गौतमी पाटील ते जरांगे पाटील व्हाया ललित पाटील असा झाल्याचं म्हणताच सभागृहात हास्याची लकेर उमटली. “सध्या राज्यातला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुरू होतोय गौतमी पाटीलपासून. जातोय मनोज जरांगे पाटलांपर्यंत.. व्हाया ललित पाटील! सध्या अशी परिस्थिती आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतला तर लोकांची तुफान गर्दी होते. मारामाऱ्या, भानगडी होतात”, असं अनिल परब यांनी म्हटलं.

“मुंबईत मुली रात्री १२ वाजता…”, महिला सुरक्षेसंदर्भात फडणवीसांचं विधानसभेतील विधान चर्चेत!

“आजकाल तर दिवाळी पहाटलाही गौतमी पाटील यायला लागली आहे. काय महाराष्ट्राची संस्कृती आहे. काय दिवस आलेत. दिवाळीच्या पहाटेला सकाळी-सकाळीच कार्यक्रमात मारामारी. काय चाललंय? प्रविण दरेकर, तुम्ही किती चांगले कार्यक्रम घेतले. आम्हाला बसायला जागा मिळत नव्हती. आम्ही रस्त्यावर उभं राहून बघितले. आता हे काय चाललंय काय?” असा खोचक प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षणावरून टीकास्र

यावेळी अनिल परब यांनी मराठा आरक्षणावरून सरकारवर टीकास्र सोडलं. “२४ तारखेची डेडलाईन जवळ येतेय. महाराष्ट्राचं वातावरण अशांत झालंय. मुख्यमंत्र्यांनी इथे मराठा आरक्षणाबाबत सविस्तर भाषण केलं. पण मराठ्यांना आरक्षण कसं देणार? हे सांगितलं नाही. या सभागृहात हा प्रस्ताव आणण्याचं कारणच हे होतं की किमान मुख्यमंत्री सांगतील की आमची तयारी अमुक टप्प्यापर्यंत झालीये वगैरे. सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेल्या चुका सुधारून आपल्याला पुढे जायचंय, म्हणजे आपलं आरक्षण टिकेल असा त्यामागचा उद्देश होता. त्या बाबतीत महाराष्ट्र अशांत आहे”, असं परब म्हणाले.

“ललित पाटीलनं कायदा-सुव्यवस्थेला सुरुंग लावला”

दरम्यान, तिसरा मुद्दा ललित पाटीलचा उपस्थित करत महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेला सुरुंग लागल्याचं अनिल परब म्हणाले. “ही कायदा-सुव्यवस्था कशी भंग पावली आहे, महाराष्ट्र कसा सुरक्षित नाही या सगळ्या गोष्टी ललित पाटील प्रकरणात समोर आल्या आहेत. ड्रग्जची समस्या महाराष्ट्रात ज्वलंत झाली आहे. मुंबईत तर तर कुठल्याही हुक्का पार्लरमध्ये ड्रग्ज मिळू लागलंय. बिल्डिंगचे वॉचमन ड्रग्ज विकायला लागले आहेत”, असा दावा अनिल परब यांनी आपल्या भाषणात केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil parab speech in vidhan parishad gautami patil law order issue in maharashtra winter session pmw