भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांविषयी अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना ७२ तासांत माफी मागण्यास सांगितलं होतं. मात्र, ७२ तासांत किरीट सोमय्यांकडून कोणतीही हालचाल न झाल्यामुळे अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात तब्बल १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. तसेच, आपण किरीट सोमय्यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती अनिल परब यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून दिली आहे. दापोलीमध्ये अनिल परब यांचे अवैध रिसॉर्ट असल्याचा देखील आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.
किरीट सोमय्या यांनी नुकतेच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्याआधी देखील त्यांनी अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. अनिल परब यांच्यावर देखील दापोलीमधील रिसॉर्टवरून त्यांनी आरोप केल्यानंतर त्यावर अनिल परब यांनी त्यांना ७२ तासांत माफी मागण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्यांनी माफी न मागितल्यामुळे आता अनिल परब यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
दरम्यान अनिल परब यांनी या याचिकेमध्ये १०० कोटींसोबतच किरीट सोमय्यांकडून विनाअट माफीची मागणी केली आहे. त्याचसोबत ही माफी त्यांनी दोन वर्तमानपत्रांमध्ये छापून आणावी आणि त्यांच्या ट्वीटर हँडलवर न्यायालय ठरवेल तेवढा काळ ही माफी ठेवावी, अशी देखील मागणी अनिल परब यांनी केली आहे.