शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी ( १० सप्टेंबर ) जळगावात सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी दुष्काळ, मराठा आरक्षण आणि विविध प्रश्नांवरून राज्य सरकारवर टीका केली. याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आपला इतिहास पाहिला पाहिजे, असा टोला अनिल पाटील यांनी लगावला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अनिल पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरे मंत्रालयात कधीही दिसले नाहीत. आता विकास आणि दुष्काळाच्या गप्पा मारत आहेत. अजित पवार आणि राष्ट्रवादीची बाकीचे लोक नसते, तर राज्याचे वाईट परिस्थिती झाली असती. जीवाची काळजी न करता स्वत:हा रस्त्यावर उतरावं लागतं. घरी बसून ऑनलाइन बैठका घेत सरकार चालत नाही.”
“उद्धव ठाकरे यांनी आपला इतिहास पाहिला पाहिजे. आपल्या कोणत्या आमदारांना भेट दिली आणि त्यांचं काम केलं, याची माहिती उद्धव ठाकरे यांनी द्यावी,” असं आव्हानही अनिल पाटील यांनी दिलं आहे.
“…तर मी राजकारणात निवृत्त होईन”
दरम्यान, अजित पवार यांची रविवारी कोल्हापूरात सभा पार पडली. यावेळी अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “लोकांची कामे करण्यासाठी आमच्यावर दबाव होता. काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरात बसता येत नाही. उद्धव ठाकरे यांचं सरकार पडत होते. तेव्हा सत्तेत सहभागी होण्याबाबत ५२ आमदारांच्या सहीचं पत्र दिलं होतं. हे जर खर नसेल, तर मी राजकारणात निवृत्त होईन. खरं असेल तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हाल का?” असं अप्रत्यक्षपणे आव्हान अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलं.