सोलापूर : यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अन्य जिल्हयात कडबा विक्रीला बंदी घातल्याने मंगळवेढा शिवारात हजारो कडब्यांच्या पेंढ्यांचे ढिगारे जैसे थे स्थितीत असून अवकाळी पडलेल्या पावसामुळे या कडब्याचे नुकसान झाले आहे. रंग बदलल्याने कडब्याची प्रत घसरल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी असून महसूल विभागाने या कडब्याचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मोहोळ तालुक्यात संजय क्षीरसागरांच्या रूपाने पोकळी भरून काढण्याचा शरद पवारांचा प्रयत्न 

मंगळवेढा शिवार राज्यात ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने जमिनीतील तुटपुंज्या ओलीवर शेतकर्‍यांनी महागडी बियाणे, खते घेवून ज्वारीची पेरणी केली होती. तद्नंतर पडलेल्या रिमझीम पावसावर ज्वारीचा शिवार ऐन दुष्काळातही डोलू लागल्याचे चित्र होते. पीक पेरणी अणि काढणीसाठी झालेल्या खर्चाचा आर्थिक ताळमेळ साधून सुगीमध्ये कडबा व ज्वारी विकून संसाराचा गाडा चालविला जातो. यंदा दुष्काळी स्थितीमुळे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर होवू नये म्हणून जिल्हा महसूल प्रशासनाने अन्य जिल्ह्यात चारा विक्री करण्यास बंदी घातल्यामुळे काळ्या शिवारातील पालेदार व चवदार कडबा जागेवर पडून राहिला. शिवारात जिकडे पाहावे तिकडे चौफेर जागोजागी कडब्याचे ढिगारे पडल्याचे चित्र आहे. मात्र मागील दोन आठवड्यांपासून अधुनमधून अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे पांढराशुभ्र चमकदार असणारा कडबा पावसात भिजून त्याचा रंग बदलून तो काळा पडला आहे. हा खराब झालेला कडबा  जनावरे खाण्यास धजत नाहीत. परिणामी, कडब्याची प्रत घसरल्याने दरही पडल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे  आहे.

शेतक-यांना आर्थिक फटका

अन्य जिल्ह्यात कडबा विक्री करण्यास बंदी घातल्याने मंगळवेढा शिवारात कडबा घेण्यास कोणताही व्यापारी येण्यास तयार नाही. त्यामुळे पडून असलेला कडबा अवकाळी पावसाने भिजून त्याची प्रत खालावली आहे. याचा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसला असून प्रशासनाने या कडब्याचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी. –दत्तात्रय बेदरे शेतकरी, बठाण

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal dry fodder damage due to unseasonal rains in solapur zws
Show comments