कासा : डहाणू-नाशिक राज्य महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. रस्त्याच्या मध्येच उभे राहून ही जनावरे रस्ता अडवत असून त्याचा वाहनचालकांना त्रास होत आहे. मोकाट जनावरांमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

रस्त्याच्या आजूबाजूला पसरलेल्या कचऱ्याकडे मोकाट जनावरे आकर्षित होतात. त्यामुळे हा कचरा खाण्यासाठी जनावरे रस्ता ओलांडत असल्याचे चित्र महामार्गावर नेहमीच दिसते. त्यामुळे रस्ता अडत असून अनेक वाहनचालकांना वाहने थांबवून या जनावरांना हाकलावे लागते. जनावरे रस्ता ओलांडताना अनेकदा अपघातही होत असून या अपघातांमध्ये वाहनांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. गेल्या आठवडय़ात चारोटी नाका येथे अपघात होऊन एका जनावराचा मृत्यू झाला. या जनावराचा मृतदेह उचलला न गेल्यामुळे दुर्गंधी पसरली होती आणि त्याचा त्रास वाहनचालकांना झाला.

मोकाट जनावरे रस्त्यावर येऊ नये यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात आणि रस्त्यावर येणाऱ्या या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा पसरलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट  लावणे तसेच योग्य त्या ठिकाणी कुंपणाची व्यवस्था करून जनावरांना रस्त्यावर येण्यापासून पायबंद घालणे शक्य असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे वाहनचालकांकडून सांगण्यात आले.

डहाणू-नाशिक महामार्गावर वारंवार मोकाट जनावरांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. यामध्ये अनेकदा छोटय़ा गाडय़ांचे नुकसान होऊन जनावरे मृत्युमुखी पडतात. जनावरांचे मृतदेह वेळेत बाजूला न केल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. त्याचा परिसरातील नागरिकांना खूप त्रास होतो. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात.

– हेमंत महेर, स्थानिक नागरिक

भातशेतीची कामे संपल्यानंतर शेतकरी आपली जनावरे मोकाट सोडून देतात. ही जनावरे चाऱ्याच्या शोधात इकडेतिकडे फिरत असून त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहे. यावर पायबंद घालण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातील.

– पी. आर. खरनार, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Story img Loader