“नाशिकमधील त्र्यंबकेश्वरच्या प्रसिद्ध शिवलिंगावर बर्फ जमा होणे हे षडयंत्र आहे,” असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. तसेच बाहेरून बर्फ आणून पिंडींवर ठेवणाऱ्या व भाविकांच्या श्रद्धांशी खेळणाऱ्या पुजार्‍यांविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी अंनिसने नाशिक जिल्हाधिकारी व त्र्यंबकेश्वर पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंनिसने म्हटले, “३० जून २०२२ रोजी त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंगावर बर्फाच्या थर जमा झाला, हा काहीतरी दैवी संकेत आहे, दैवी चमत्कार आहे, असा दावा करणारा व्हिडिओ प्रसार माध्यमातून प्रसारित झाला. यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील कार्यकर्त्यांनी तातडीने याची गंभीर दखल घेतली. तसेच घटनास्थळावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा ही घटना मानवी हस्तक्षेपाशिवाय घडणे शक्य नाही, असे लक्षात आले.”

“दोषींवर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा”

“हे लक्षात आल्यानंतर त्या दिवसाच्या, त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जावेत आणि दोषींवर जादूटोणाविरोधात कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली. यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त आणि पोलीस निरीक्षक त्रंबकेश्वर पोलीस ठाणे यांना पत्रही देण्यात आले,” अशी माहिती अंनिसने दिली.

“मानवी हस्तक्षेपाशिवाय शिवलिंगावर बर्फ जमा होणे शक्य नाही”

“मंदिरातील शिवलिंगावर बर्फ जमा होण्याची घटना मानवी हस्तक्षेपाशिवाय शक्य नाही, हा आमचा अंदाज खरा ठरला आहे . कारण काल त्र्यंबकेश्वर मंदिरातील एक पुजारी आणि त्यांचे दोन सहकारी यांच्यावर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोषींवर या गुन्ह्यात इतर कलम लावलेले आहेत. मात्,र जादूटोणाविरुद्ध कायद्याचे कलम लावलेले नाही. म्हणून इतर कलमांबरोबरच दोषींवर जादूटोणाविरोधी कायद्याचेही कलम लावावे,” अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने केली.

हेही वाचा : “धीरेंद्र महाराजांनी ‘या’ २१ जणांच्या ATM चे पासवर्ड सांगावे आणि २१ लाख रुपये बक्षीस जिंकावे”, छत्रपती सेनेचे खुले आव्हान

“गुन्हा दाखल होण्यासाठी सात महिन्यांचा कालावधी का लागला?”

“प्रत्यक्ष सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे असतानाही हा गुन्हा दाखल होण्यासाठी सात महिन्यांचा कालावधी का लागला, याची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवरही कडक कायदेशीर कारवाई करावी,” अशी विनंती अंनिस राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे व त्र्यंबकेश्वर शहर कार्याध्यक्ष संजय हरळे यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anis demand fir against priest of tryambakeshwar temple under jadutona act for false claim in nashik pbs