अनेक सामाजिक कार्यकर्ते अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करत असताना काही राजकीय व्यक्ती ज्योतिषी, बुवा-बाबा यांच्या आहारी गेलेले पाहायला मिळतात. हे राजकीय नेते निवडणुकीच्या अर्जापासून अनेक महत्त्वाचे काम बुवा-बाबांच्या सल्ल्यानुसारच करतात. मात्र, नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशकार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी याला अपवाद ठरले. कर्नाटकात अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणाऱ्या जारकीहोळी यांनी अशुभ समजल्या जाणाऱ्या राहू काळात आपला उमेदवारी अर्ज भरला, स्मशानात प्रचार केला आणि त्यानंतर निवडूनही आले. यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रतिक्रिया दिली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी काँग्रेसचे प्रदेशकार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्याशी संपर्क साधून अभिनंदन केले. तसेच अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कार्यक्रमासाठी नाशिकला येण्याची विनंती केली. कृष्णा चांदगुडे म्हणाले, “आपले राजकारणी यांना उठता बसता ज्योतिषी ,बुवा-बाबा पाहिजे असतात. स्वतः अंधश्रद्ध असल्यास जनतेला ते काय संदेश देणार? त्यांनी या घटनेतून बोध घेऊन अंधश्रद्धेतून बाहेर पडले पाहिजे.”
कोण आहेत सतीश जारकीहोळी?
सतीश जारकीहोळी हे काँग्रेसचे नेते आहेत. ते पुरोगामी विचारांचे असून कर्नाटकात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते म्हणूनही काम करतात. समाजातील अंधश्रद्धा दूर व्हाव्यात यासाठी ते जाणीवपूर्वक उपक्रम राबवत असतात. ते मानव बंधुत्व वेदिके या सामाजिक संस्थेचे संस्थापक आहेत. अनेक वेळा त्यांनी स्मशान सहली काढून स्मशानात जेवणही केले आहे. इतकेच नाही, तर ते स्मशानात मुक्कामीही राहिले आहेत.
महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकमध्येही जादुटोणा विरोधी कायदा लागू व्हावा यासाठी त्यांनी सरकारवर वारंवार दबाव आणला. इतकंच नाही तर याच मुद्द्यावर सरकार पुढाकार घेत नसल्याने निषेध म्हणून २०१५ मध्ये त्यांनी आपला मंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर कर्नाटकात जादुटोणा विरोधी कायदा लागू झाला. पुढे त्यांनी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेतला.
हेही वाचा : समाजवाद रुजलेल्या कर्नाटकात हिंदुत्ववाद पेरणे महागात पडले? विधानसभा निकालाने काय साधले?
यंदाच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जनतेला सकारात्मक संदेश देण्यासाठी सतीश जोरकीहोळींनी निवडणूक अर्ज भरण्यासाठी अशुभ मानल्या जाणाऱ्या राहू काळाची निवड केली. इतकंच नाही, तर चक्क स्मशानभूमीत प्रचारसभा घेतल्या आणि निवडूनही आले. ते मागील निवडणुकीतही प्रचारसभा न घेता निवडून आल्याने चर्चेत होते. ते स्वतः यावेळी चौथ्यांदा महाराष्ट्राच्या सीमेलगत बेळगावच्या यमकनमर्डी मतदारसंघातून निवडून आले आहेत. ते कर्नाटक काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आहे. ते अनेक वर्ष मंत्रीमंडळात विविध खात्यांचे मंत्री राहिले आहेत.