anjali damania on dhananjay munde : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सीआयडीने आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यामध्ये या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मीक कराड असल्याचं खुलासा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याबबात अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान या हत्या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच दमानिया यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणावर बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, “पुरावे म्हणून जे काही देण्यात आलं होतं, त्याचा क्रम पाहिला तर या लोकांनी मुद्दाम, राजकीय दबाव होता म्हणून तीन वेगवेगळ्या केसेस केल्या होत्या. यामध्ये खंडणी, अॅट्रॉसीटी आणि हत्या हे गुन्हे वेगवेगळे होते. आता या तीनही केस एकत्र आल्याने आता खात्री पटली आहे की यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव होता आणि तो धनंजय मुंडे यांचा होता. म्हणून पहिल्या दिवासापासून मी म्हणत होते की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे.”

“आज सिद्ध झालं आहे की ही तीन वेगवेगळी प्रकरणे कधीच नव्हती. याची सुरूवात २९ नोव्हेंबर रोजी झाली, ज्यामध्ये आधी सुदर्शन घुलेच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागीतली. त्यानंतर ६ तारखेला मारामारी झाली त्यामध्ये त्यांच्यावर सर्व सेक्शन लागले होते. त्यांचा जामीन करायला बालाजी तांदळे माणूस पोहचला आणि त्याने त्यांचा जामीन केला. ७ तारखेला सुदर्शन घुले हा वाल्मिक कराड याच्याशी बोलतो की यापुढे अशी माणसे आपल्या आड यायला लागली तर त्यांचा काटा काढायला पाहिजे. ८ तारखेला विष्णु चाटे आणि सुदर्शन घुले तिरंगा हॉटेलमध्ये भेटले आणि चर्चा केली की संतोष देशमुख आडवा आला तर त्यांना संपवायचं,” असे अंजली दमानिया टीव्ही९शी बोलताना म्हणाल्या.

“महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिजीटल पुरावे मिळाले आहेत, जो व्हॉट्सअॅप कॉल केला गेला, यामधून दिसतं की सगळ्यांनी हे कृत्य होताना बघीतलं आहे. आतापर्यंत आपण ऐकलं होतं पण आता हे चार्जशीटमध्ये नोंदवले गेले आहे. असं कृत्य ही माणसं बघच असतील तर त्यांचं सिंडीकेट ही माणसं नाहीतच, की क्रूर जमात आहे आणि यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे,” असेही दमानिया म्हणाल्या.

“पोलिसांनी असही रेकॉर्ड केलं आहे की, गेल्या दहा वर्षात यांनी ११ गुन्हे केले आहेत. मी मानत नाही की यांनी अकराच गुन्हे केलेत. यांनी किमान २५ पट जास्त गुन्हे केले असतील, पण एफआयआर होत नाहीत,” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.

राजीनामा घेतला नाही तर…

“बीडमध्ये प्रत्येक दुकानदराकडून खंडणी, हप्ते फिक्स असतात, तेवढे पैसे त्यांना पोहचवावेच लागतात. येवढं मोठं सिंडीकेट काम करत आहे, हे कोणाच्या आशीर्वादाने? ते फक्त धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने. तीन गुन्हे वेगळे केले तो राजकीय दबाव होता. खरंतर हे तीनही गुन्हे कधीही वेगळे नव्हते. वाल्मिक कराडला कुठेतरी वाचवायचं म्हणून धनंजय मुंडे यांनी डोकं लावून हे वेगवेगळे करायला लावले. हा माझा थेट आरोप आहे. आता जर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही तर महाराष्ट्राने पेटून उठलं पाहिजे” असेही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.