Anjali Damania on Dhananjay Munde and Walmik Karad : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मिक कराड याच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत. वाल्मिक कराडला अटक देखील करण्यात आली असून सध्या त्याची चौकशी चालू आहे. दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांकडून धनंजय मुंडे व वाल्मिक कराडचे आर्थिक हितसंबंध असल्याचा देखील आरोप होत आहे. यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे म्हणाले, “हे सगळं खोटं आहे, प्रत्येक गोष्ट खोटी आहे, प्रत्येक आरोप खोटा आहे. माझ्यावर जे काही आरोप होत आहेत त्यापैकी एक तरी आरोप त्यांनी (विरोधकांनी) खरा करून दाखवावा. विनाकारण मला त्यावर बोलायचं नाही. सध्या मी त्यावर काही बोलणारही नाही. जेव्हा मला त्यावर बोलायचं असेल तेव्हा मी बोलायला कमी पडणार नाही हे तुम्ही सगळेजण जाणता.
मुंडे म्हणाले, “सध्याची परिस्थिती पाहता बीडमध्ये सामाजिक सलोखा निर्माण होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्यातील नागरिकाला आणि या मातीतील माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे. तसेच माझ्यावर किंवा इतर कोणावर आरोप करायचे असतील तर खुशाल करावे, परंतु माझ्या बीड जिल्ह्याची व इथल्या मातीची बदनामी करू नका”.
धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मुंडे यांना आवाहन केलं आहे की त्यांनी आता मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी करायला हवी. अंजली दमानिया यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर याबाबत एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “धनंजय मुंडे, बीडच्या मातीची बदनामी तुम्ही केली, तुमच्या वाल्मिक कराडने केली, सुदर्शन घुले व विष्णू चाटेने बीडची बदनामी केली. संतोष देशमुखांसारख्या निष्पाप माणसाच्या निर्घृण हत्येने केली, जाऊ द्या, मला त्यावर फार बोलवत नाही. बीड जिल्ह्यातील दहशत संपवून आम्ही ही माती पुन्हा पवित्र करण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्याच पक्षातील लोक अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या बीड ृबद्दल काय म्हणाले होते ते वाचा. ‘राज्यातील एका जिल्ह्यात चालू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होतं आहे’, असं तुमच्याच पक्षातील लोक म्हणाले आहेत. ‘बीड हत्याकांड प्रकरणी लवकरात लवकर पक्ष नेतृत्वाने पक्षाच्या हिताचा विचार करून निर्णय घ्यायला हवा’. आगामी निवडणुकांसाठी आशा प्रकारची बदनामी होणं पक्षहिताचं नाही. ही वक्तव्ये पाहून आता तुम्ही राजीनामा द्यायची तयारी करा”.
धनंजय मुंडे काय म्हणाले होते?
मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, “माझी विरोधकांना,माझ्यावरआरोप करणाऱ्यांना एवढीच विनंती आहे की ठीक आहे, त्यांना मला बदनाम करायचं असेल तर करावं. त्यांना आणखी कोणाला बदनाम करायचं असेल तर त्याला देखील बदनाम करा. परंतु, कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला, इथल्या मातीला बदनाम करू नका. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या पवित्र वैद्यनाथ नगरीला कोणीही बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. माझी सर्वांना एवढीच माझी विनंती आहे”.