Anjali Damania : स्वारगेटच्या बस डेपोमध्ये एका २६ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाला. या घटनेने पुणे हादरलं आहे. दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, या घटनेनंतर राज्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत अंजली दमानिया यांनी पोस्ट केली आहे. प्रश्न उपस्थित केले आहेत.

नेमकी घटना काय घडली?

पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करणाऱ्या तरुणीवर स्वारगेट एसटी बस स्टँडवर बलात्कार करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे. आरोपीच्या शोधासाठी आठ पथकं रवाना करण्यात आली आहेत.

अंजली दमानिया यांची पोस्ट काय?

स्वारगेटला झालेली घटना आज कळली ? २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला, ते पण आगराच्या आत?

CCTV नुसते शो साठी आहेत का? कोणीच मॉनिटर करत नाही ?

पुन्हा पुन्हा अशा घटना होतात ते बघून खूप त्रास होतो. ती मुलगी बरोबर कोणीच नव्हत. काय केले असेल एकटीने? ती आता ठीक आहे ते ऐकून थोडं हायसे वाटले My energies with her. जरापण खचू नकोस बेटा. तुझ्या मनावर आघात खूप मोठा आहे, पण ह्यातून ताकदीने बाहेर ये.

रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया काय?

रुपाली चाकणकर म्हणाल्या, “पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. अनेक तालुक्यातील वाड्या-वस्त्यांमधून मुली शिकायला पुण्यात येत असतात. तसं पाहिलं तर पुण्यात मुली कायम सुरक्षित राहिल्या आहेत. पुण्यात शिकायला येणाऱ्या मुलींना सुरक्षित वाटत असतं. पण स्वारगेट येथे घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे.”

सुप्रिया सुळे यांनी काय म्हटलं आहे?

स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शविणारी आहे. या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यांवर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेले नाही. ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली याचे प्रत्यंतर देणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे . यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी आमची मागणी आहे.

Story img Loader