Anjali Damania Ajit Pawar Income Source : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या त्यांच्या कुटुंबाबरोबर परदेशात फिरायला गेल्या होत्या. त्यांच्या या परदेशवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील पदाधिकारी सुरज चव्हाण यांनी टीका केली होती. “कष्टाच्या पैशांनी कुठे फिरलात” ते सांगा असं चव्हाण म्हणाले होते. तसेच चव्हाण यांनी दमानिया यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. दरम्यान, दमानिया या आता भारतात परतल्या आहेत. काही वेळापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी सांगितलं की “मी आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेद्वारे मी सर्व आरोपांना उत्तर देईन व काहींना धडा शिकवणार आहे. या पत्रकार परिषदेत दमानिया मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा होत आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, माझा लढा हा अजित पवार, सुनील तटकरे, एकनाथ खडसे व नितीन गडकरींविरोधात आहे. मी गेल्या ११ वर्षांपासून त्यांच्याविरोधात लढत आहे. हल्ली अनेक पक्षांमधील नेते त्यांची बाजू मांडण्यासाठी, त्यांच्यावरील टीकेला व टीकाकारांना उत्तर देण्यासाठी राम आणि श्याम बाळगतात. या नेत्यांवर कोणी टीका केली तर हे राम-श्याम बाहेर येऊन प्रत्युत्तर देतात. देवेंद्र फडणवीसांवर कोणी टीका केली की प्रसाद लाड, प्रवीण दरेकर बाहेर येतात. अजित पवार यांच्याविरोधात कोणी चकार शब्द काढला तरी लगेच अमोल मिटकरी, सुरज चव्हाण बाहेर येऊन वाट्टेल ते बोलतात. यांच्याकडे बोलण्याचं ताळतंत्र नाही.
हे ही वाचा >> “महाराष्ट्रात तीन ‘घाशीराम कोतवालांचं’ राज्य आहे, आम्ही लवकरच..”, संजय राऊत यांची बोचरी टीका
अंजली दमानियांचा इशारा
सामाजिक कार्यकर्त्या म्हणाल्या, अमोल मिटकरी माझ्याविरोधात वाईट बोलले नाहीत. कारण त्यांना कदाचित कल्पना असेल किंवा त्यांनी गुगलवर माहिती गोळा केली असेल. सुरज चव्हाण मात्र ताळतंत्र नसलेला माणूस आहे. मी या लोकांना आता सरळ करणार आहे. यांनाच नाही तर, यांच्या मालकांनाही सरळ करणार आहे. मी काय आहे हे अजित पवारांना चांगलंच माहीत आहे. सुनील तटकरे, छगन भुजबळांना देखील माहिती आहे. मी माझ्या तत्त्वांवर काम करते. सुरज चव्हाणांसारख्या नव्या लोकांना काही माहिती नसते. राजकारणाची जाण नसते. ते काहीही बोलतात. कारण त्यांना अजित पवारांना दाखवायचं असतं की बघा दादा मी तुमच्यासाठी किती लढतोय. मात्र मी आता यांना आणि यांच्या मालकांना धडा शिकवणार आहे. तुम्ही राजकारणात येऊन निवडणूक लढण्याच्या आधीच तुमचं राजकारण संपवणार आहे.
हे ही वाचा >> Amol Kolhe : “सरकारची धाकधूक आणि पाकपूक वाढली आहे म्हणूनच…”, अमोल कोल्हेंची टोलेबाजी
अंजली दमानिया म्हणाल्या, आज दुपारी चार वाजता मी पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत मी माझ्या उत्पन्नाची माहिती देणार आहे. अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे आणि या राज्याच्या राजकारणातील नेत्यांनी देखील त्यांच्या उत्पन्नाविषयीची माहिती द्यायला हवी. त्यांचा उत्पन्नाचा मार्ग सांगायला हवा. अजित पवार यांच्याकडे इतका पैसा कुठून येतो हे त्यांनी सांगायला हवं. गुलाबी गाड्या, कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना गाड्या देण्यासाठी पैसे येतात कुठून? हा अफाट खर्च ते कसा करतात हे अजित पवारांनी एकदा स्पष्ट करायला हवं.