देशभरातले सगळेच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. निवडणुका आल्या की, राजकारणी मंडळी आणि पक्ष प्रचंड प्रमाणात पैसे खर्च करताना दिसतात. परंतु, एका बाजूला भारतीय राष्ट्रीय काँग्रेससारखा पक्ष तिजोरी रिकामी असल्याचं सांगत लोकांकडून पैसे गोळा करत (क्राउड फंडिंग) असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसाठी ८० गाड्यांचं बुकिंग केलं असल्याची बातमी अनेक वृत्तपत्रं आणि संकेतस्थळांनी प्रसिद्ध केली आहे. अजित पवार गटाने पदाधिकाऱ्यांसाठी ४० महिंद्रा स्कॉर्पियो आणि ४० महिंद्रा बोलेरो बूक केल्या आहेत, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. यावरून अजित पवारांच्या संपत्तीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अजित पवार गट आगामी निवडणुकीआधी त्यांच्या जिल्ह्याध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना महागड्या गाड्या भेट म्हणून देणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या जिल्ह्याध्यक्षांना कार भेट देण्याची घोषणा केली होती. आता ही घोषणा ते अंमलात आणणार आहेत. यासाठी महिंद्राच्या स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांचं टेस्टिंग चालू आहे. काही गाड्या पक्षाच्या विधीमंडळाजवळच्या पक्ष कार्यालयात टेस्ट ड्राईव्हसाठी आणल्याचं सांगितलं जात आहे. या गाड्यांच्या खरेदीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, ४० स्कॉर्पिओ आणि ४० बोलेरो अशा एकूण ८० गाड्या भेट म्हणून दिल्या आहेत. परंतु, या गाड्या कुठून आल्या? त्यासाठी इतके पैसे कुठून आले? एका महिंद्रा स्कॉर्पिओची किंमत २४.५० लाख रुपयांच्या आसपास आहे. तर बोलेरोची किंमत १३ लाख रुपये इतकी आहे. म्हणजेच या ८० गाड्यांसाठी १५ ते १६ कोटी रुपये खर्च केले आहेत. हे १५-१६ कोटी रुपये कुठून आले? कोणी दिले? अजित पवार यांनी स्वतः दिले की त्यांच्या पक्षाने दिले? मला एका गोष्टीची गंमत वाटते की, या सगळ्या गोष्टी ईडी (सक्तवसुली संचालनालय), एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) आणि निवडणूक आयोगाला दिसत नाहीत का?
हे ही वाचा >> जालन्यात शरद पवार की अजित पवार कोणत्या गटाचे वर्चस्व ?
अंजली दमानिया यांनी एक्स या मयक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्टदेखील केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, जो गट अजून पक्ष म्हणून घोषित झालेला नाही, त्या पक्षाने इतक्या अफाट गाड्या कुठून खरेदी केल्या? त्यासाठी पैसे कुठून आले? कोणी देणग्या दिल्या? आता ED/ACB आणि EC ने डोळे मिटून घेतले आहेत का? हे सगळे सिंचन घोटाळ्यातले पैसे आहेत की अजित पवारांनी काबाडकष्ट करून कमावलेले पैसे आहेत? कुठून येतात एवढ्या गाड्या? सामान्य माणसाला एक गडी घेणं परवडत नाही.