Anjali Damania on Dhananjay Munde Walmik Karad : वाल्मिक कराड, विष्णू चाटे व त्यांच्या टोळीने आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचं प्रकरण व बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण एकमेकांशी संबंधित आहेत. या हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजड मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड अटकेत आहे. कराडबरोबर त्याचे सात साथीदार न्यायालयीन कोठडीत आहेत. याच प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आहे. आता आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या प्रकरणातही धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना या प्रकरणी सहआरोपी करण्यात यावं अशी मागणी केली आहे.

आवादा कंपनीला धनंजय मुंडे यांच्या जगमित्र साखर कारखान्याच्या कार्यालयातून आणि सातपुडा बंगल्यावरून (मंत्री असतानाचा धनंजय मुंडे यांचा बंगला) धमकी देण्यात आली होती, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.

अंजली दमानिया यांचा नेमका आरोप काय?

अंजली दमानिया म्हणाल्या, आवादा कंपनीकडून खंडणी मागितली जात होती. मे महिन्यापासून खंडणीसाठी पाठपुरावा केला जात होता. त्याच दरम्यान, २८ मे रोजी कंपनीतील कर्मचाऱ्याचं अपहरण करण्यात आलं. सातत्याने खंडणी मागितली जात होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या जगमित्र साखर कारखान्याच्या कार्यालयात बोलावून खंडणी मागितली. पाठोपाठ सातपुडा बंगल्यावर बोलावून खंडणीसाठी धमकावण्यात आलं. सातपुडा बंगल्यावर बोलावण्यामागचा हेतू स्पष्ट होता की त्यांना कंपनीच्या कर्मचाऱ्याला दाखवायचं होतं की आम्ही मंत्र्याच्या बंगल्यावर बोलावून तुला धमकावू शकतो. याचा अर्थ तुला पैसे द्यावेच लागतील. त्यामुळे यामागे धनंजय मुंडे होते की नव्हते ते देखील स्पष्ट आहे. एकदा नव्हे तर सहा वेळा अशा प्रकारे खंडणी मागण्यात आली. त्यामुळे मला वाटतं की आता या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्यात यावं.”

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील दोषारोप पत्रावरून अंजली दमानिया यांचे प्रश्न

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रात काही मुद्दे संशयास्पद असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की “दोषारोप पत्रातील पान ३६ वर ‘टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले’ असा उल्लेख का केलाय? तो टोळीचा प्रमुख कसा? पुढच्या पानावर जरी वाल्मिक कराड नंबर १ वर असेल, तरीही हे वाक्य वगळले पाहिजे. दुसरा मुद्दा – वाल्मिक कराडबद्दल लिहिलं आहे की त्यांनी ‘आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावा लागेल’ असं त्याने सुदर्शन घुले याला सांगितलं आणि “कामाला लागा, विष्णू चाटेशी बोलून घ्या”. चार्जशीटमध्ये एवढंच लिहिलं आहे. हे सर्व पाहून उद्या वाल्मिक कराड म्हणेल, ‘मी कुठे त्यांना मारा असं म्हटलं?’ ही कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याची पळवाट आहे का?”

Story img Loader