अंजली दमानिया यांची टीका
राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे हे तर भाजपचे छगन भुजबळ आहेत, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी केली आहे. खडसे यांनी माध्यमांमध्ये त्यांच्या मालकीची अनधिकृत जमीन शोधून दिल्यास बक्षिस देण्याचे जाहीर केले होते. त्याच अनुषंगाने त्यांची संपत्ती आणि स्थावर मालमत्तेची तपशीलवार माहिती घेण्याचे काम सुरू असून मुक्ताईनगर येथील जमिनीविषयी लवकरच माहिती देण्यात येणार असल्याचेही दमानिया यांनी सांगितले.
बुधवारी येथील तापी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना दमानिया यांनी जिल्ह्य़ातील अनेक सिंचन प्रकल्पांमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्यापैकी दोन मोठय़ा प्रकल्पातील गैरप्रकारांची माहिती मिळविण्यात येत असल्याचे नमूद केले. या प्रकल्पांची कामे श्रध्दा कन्स्ट्रक्शनला देण्यात आली होती. या प्रकल्पांच्या मूळ किमतीत वाढ झाली असून प्रत्यक्षात किती पैसा खर्च झाला हेही लवकरच जाहीर करण्यात येईल. कुऱ्हा वडोदा उपसा सिंचन योजना, पद्मालय सिंचन प्रकल्प, तापी नदीवरील तीन पूल, निम्न तापी बंधाऱ्याचे काम यासंदर्भातील माहिती तापी पाटबंधारे विभागाकडे मागण्यात आली आहे. सर्व कागदपत्रे हाती आल्यानंतर माहिती जाहीर करण्यात येईल. खडसे यांच्याकडे गैरमार्गाने येणारा पैसा सात संस्थांच्या माध्यमातून चलनात आणला जात आहे, असा आरोपही दमानिया यांनी केला. खडसे यांच्या जावयाची लिमोझिन कार जप्त का करण्यात आली नाही याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाकडे विचारणा करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणात आपल्यावर प्रचंड दबाव असून खडसे यांच्या अनधिकृत जमिनींविषयी कोणाकडे माहिती असल्यास त्यांनी ती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.