अंजली दमानिया यांच्या तक्रारीनंतर परिवहन अधिकाऱ्यांची ग्वाही
सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांच्या लेखी तक्रारीनंतर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांनी घेतलेल्या ‘लिमोझिन’ कारची चौकशी करण्याचे आश्वासन जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष वारे यांनी दिले.
खडसे यांच्या विविध प्रकरणांची माहिती घेण्यासाठी दमानिया यांनी जळगावमध्ये मुक्काम ठोकला आहे. याअतंर्गत गुरूवारी त्यांनी जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास भेट देत खडसे यांचे जावई डॉ. खेवलकर यांच्या लिमोझिन या वादग्रस्त वाहनाविषयी माहिती घेतली. हरियाणामधून आणलेल्या लिमोझिनची जळगाव पासिंग करून खेवलकर हे वापर करत असल्याची तक्रार दमानिया यांनी केली होती. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात या कारची नोंदणी करून एमएच १९ ए क्यु ७८०० हा क्रमांक देण्यात आला होता. कारमध्ये परस्पर फेरबदल करून तिचा वापर खेवलकर करत असल्याने या वाहनावर कारवाई करावी, अशी तक्रार दमानिया यांनी परिवहन अधिकारी सुभाष वारे यांच्याकडे दिली. तसेच खडसे यांच्या इतर सर्व वाहनांची माहितीही मागितली.
प्रसार माध्यमातून खेवलकर यांच्या लिमोझिन कारविषयी माहिती समोर आल्यानंतर या कारची माहिती परिवहन विभागाच्या नाशिक येथील सहाय्यक आयुक्तांना लेखी कळविण्यात आल्याचे वारे यांनी सांगितले. वरिष्ठ कार्यालयाकडून या गाडीचे कागदपत्र तपासण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. या वाहनाची नोंदणी झाली असून कर भरण्यात आला आहे. याआधी लिमोझिनची तक्रार आपल्याकडे न आल्याने कार्यवाही केलेली नाही. दमानिया यांनी लेखी तक्रार केल्याने चौकशी करण्यात येईल, असे वारे यांनी नमूद केले.