Anjali Damania : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चर्चेत आहे. ९ डिसेंबर २०२४ या दिवशी त्यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. यानंतर या प्रकरणातल्या आरोपींना अटकही झाली. तर वाल्मिक कराड हा पोलिसांना ३१ डिसेंबरला शरण आला. दरम्यान सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर मकोका लावण्यात आला, काही दिवसांपूर्वीच वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला. आता वाल्मिक कराड आणि हत्येतील आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा धक्कादायक प्रकार आहे असं म्हटलं आहे.
व्हायरल फुटेजमध्ये काय?
व्हायरल सीसीटीव्ही फुटेज विष्णू चाटे याच्या केज येथील कार्यालयाबाहेर आहे. २९ नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता. यावेळी वाल्मिक कराड याच्यासह संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करणारे प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि त्यांचे मित्र दिसत आहेत. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले पीएसआय राजेश पाटील हेदेखील वाल्मिक कराड यांना भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत.
वाल्मिक कराड खंडणी मागण्यासाठी आला होता अशा चर्चा होत आहेत
वाल्मिक कराड खंडणी मागण्यासाठीच आला होता अशा चर्चा होत आहेत. राजेश पाटील यांचा विष्णू चाटेला हॉटेलमध्ये भेटतानाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या व्हिडीओमध्येही संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या वाल्मिक कराडच्या गँगसह राजेश पाटील दिसून आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अवादा कंपनीकडून खंडणी मागितली त्यादिवशी राजेश पाटील हे वाल्मिक कराडला का भेटले असावेत? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
“सगळ्यात गंभीर बाब ही आहे की गुन्हेगार तर फुटेज मध्ये बरोबर दिसत आहेत, ते असणारच. पण त्यांच्या बरोबर पीएसआय राजेश पाटील होते. त्यांची फक्त बदली करण्यात आली आहे. अशा अधिकाऱ्यांना गुन्हेगार केलं पाहिजे, सहआरोपी केलं जात नाही तोपर्यंत न्याय कसा मिळेल? जर त्या अधिकाऱ्याने आपलं काम चोखपणे केलं नसतं तर असे गुन्हे घडलेच नसते आणि संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती.” असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. टीव्ही ९ मराठीशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर सुरेश धस यांनीही या प्रकरणात राजेश पाटील यांना सह आरोपी केलं जावं असं म्हटलं आहे.