Anjali Damania on Jaykumar Gore : “जयकुमार गोरेंसारख्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे”, असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं आहे. “वाईट कामं करणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे”, असंही त्या म्हणाल्या. अंजली दमानिया यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, काल रात्री मला अशी माहिती मिळाली की स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका महिलेला जयकुमार गोरे गेल्या अनेक वर्षांपासून त्रास देत होते. त्या त्रासाला कंटाळून या महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली होती. त्यानंतर जयकुमार गोरे तुरुंगात गेले. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी परत त्या महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. आता ते मंत्री झाले आहेत. आता त्यांचा त्रास आणखी वाढला आहे. त्यांच्यावर आता कारवाई व्हायला हवी. तसेच त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे.”
अंजली दमानिया राज्यातील महायुतीच्या सरकारविरोधातील संताप व्यक्त करत म्हणाल्या, “सगळे तुरुंगातून बाहेर आलेले लोक मंत्रिमंडळात घेतले जातात. यापूर्वीदेखील असं घडलं आहे. तोच प्रकार आता पुन्हा झाला आहे. जयकुमार गोरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात घेतलं आहे. मंत्री झाल्यावर गोरे यांनी पुन्हा त्या महिलेला त्रास द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जयकुमार गोरे यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून बरखास्त करावं, अशी मागणी मी केली आहे. अशा मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाहेर फेकून द्यायला हवं.”
संजय राऊत गोरेंविरोधात आक्रमक
शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर जयकुमार गोरे यांचं नाव घेत त्यांच्यावर विनयभंगाचे आरोप केले. राऊत म्हणाले, “स्वारगेटमध्ये जो प्रकार (बलात्कार) घडला तो प्रकार देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबतही घडल्याचं समोर आलं आहे. शिवछत्रपतींच्या काळातील स्वराज्याचे सरसेनापाती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका महिलेचा गोरे यांनी त्रास दिला, त्या महिलेचा कसा छळ आणि विनयभंग केला, यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. ती अबला स्त्री पुढील काही दिवसांत विधान भवनासमोर उपोषणाला बसणार आहे. संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळात आहे. आता हे पात्र नवीन निर्माण झालं आहे. फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील पत्ते पिसले पाहिजेत. ही सर्व रत्नं त्यांनी एकदा तपासली पाहिजेत.” दरम्यान, जयकुमार गोरे यांनी या सर्व आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. “न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केलं असून माझ्यावर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी” असं गोरे यांनी म्हटलं आहे.