राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. छगन भुजबळांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी कधी होणार? अशी विचारणा करणारी याचिका दमानिया यांनी दाखल केली आहे. दमानिया यांनी न्यायालयात धाव घेतल्याने छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे.

न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अंजली दमानिया म्हणाल्या, “नाशिकचे आमदार सुहास कांदे यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत एक लक्ष्यवेधी लावली होती. छगन भुजबळ यांच्याविरोधातील प्रलंबित कारवाई कधी होणार? भ्रष्टाचार विरोधी पथक कधी कारवाई करणार? असे प्रश्न त्यांनी विचारले होते.”

हेही वाचा- भाजपा नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश; उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “हुकूमशाहीची वळवळ…”

“ही लक्ष्यवेधी एप्रिलमध्ये लावली होती. आज आपण ऑक्टोबरमध्ये आहोत. अजूनही भ्रष्टाचार विरोधी पथकाने छगन भुजबळांवर कुठलीही कारवाई केली नाही. याचा अर्थ काय? तुम्ही जर मोठे नेते असाल आणि तुम्ही कितीही भ्रष्टाचार केला, तर तुम्ही एकच काम करायचं, सत्ताधारी पक्षात जाऊन बसायचं, असा आहे का?” असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला.

हेही वाचा – “…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू”, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य

दमानिया यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबद्दल विचारलं असता मंत्री छगन भुजबळ म्हणाले, “त्या कसली चौकशी करतायत, याची मला कल्पना नाही. महाराष्ट्र सदन प्रकरणातून माझी सुटका झाली आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालयात काय मागणी केली आहे? याची मला कल्पना नाही.”

Story img Loader