Anjali Damania on Santosh Deshmukh Murder case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तत्पूर्वी मकोका दाखल झालेला आरोपी विष्णू चाटेला बीडऐवजी लातूरमधील कारागृहात हलविण्यात आले आहे. विष्णू चाटे सारख्या आरोपीला तुरुंगाचा पर्याय कसा काय दिला जाऊ शकतो? असा सवाल आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. विष्णू चाटेची मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांनी पोलीस प्रशासनावर जोरदार टीका केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानिया अनेक दिवसांपासून आक्रमकरित्या पाठपुरावा करताना दिसत आहेत. वाल्मिक कराड आणि इतर आरोपींच्या सहसंबंधाबाबतचे अनेक पुरावे त्यांनी समोर आणले होते. तसेच आरोपींचे नेत्यांसमवेत असलेले जुने फोटोही त्यांनी एक्सवर पोस्ट केले होते. आता विष्णू चाटेला बीड ऐवजी लातूर कारागृहात हलिवण्याच्या निर्णयामागे मोठे राजकारण असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
लातूर कारागृहात विष्णू चाटेच्या ओळखीचे अधिकारी
लातूर कारागृहात विष्णू चाटेच्या ओळखीचे पोलीस अधिकारी असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. यासाठी त्यांनी एक्सवर एक यादीच टाकली आहे. नारायण मुंडे (जवळचे नातेवाईक), मुरलीधर गित्ते (बंदूकवाल्या फडचा मेव्हणा), श्रीकृष्ण चौरे (मावसभाऊ) हे विष्णू चाटेच्या मर्जीतले अधिकारी आहेत, असा आरोप दमानिया यांनी केला.
आरोपींना आर्थर रोड कारागृहात हलवा
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, मी करत असलेले आरोप हे कोणत्याही समाजाच्या विरोधात नाहीत. एखादा आरोपी कारागृह मागून घेत असेल तर त्यामागचे कारण समजून घेतले पाहीजे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कारागृहात टाकल्यापासूनच त्यांना विशेष वागणूक देण्याची सुरुवात झाली होती. आरोपींना ताबडतोब मुबंईला हला आणि त्यांना आर्थर रोड कारागृहात टाका, अशीही मागणी त्यांनी केली.
दरम्यान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी आणि माझे काही सहकारी ऑर्थर रोड तुरुंगात राहिलो आहोत. त्यामुळे तिथली परिस्थिती काय आहे, हे आम्हाला माहीत आहे. पण आरोपींना विशेष वागणूक द्यायची असेलच तर ती नरकातही दिली जाऊ शकते, कारण सरकार त्यांचेच आहे.