Anjali damania : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना ९ डिसेंबर रोजी घडली. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील आरोपी सध्या कोठडीत आहेत. तसेच या घटनेतील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. या बरोबरच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र, मंत्री धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड हा निकटवर्तीय असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

बीड जिल्ह्यातील सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. आज अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी या भेटीत अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केल्याचं त्यांनी माध्यमांशी सांगितलं आहे. तसेच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या एकत्र कंपन्यांचे काही कागदपत्रही अजित पवार यांच्याकडे दिले असल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलं. तसेच उद्या अजित पवार यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याची चर्चा करणार असल्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिल्याचंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

“उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मी २५ ते ३० मिनिटे चर्चा केली. त्यांचं म्हणणं असं होतं की बीडमध्ये जी घटना घडली ती घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. त्या घटनेचं कुठेही समर्थन करत नाहीत. तसेच मी अजित पवारांना काही पुरावे दाखवले. कशा पद्धतीने धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र व्यवसाय आहेत? त्यांच्या कंपन्यामध्ये आर्थिक नफा कसा मिळतो? हे सर्व अजित पवारांना सांगितलं आहे. तसेच धनंजय मुंडेंचा राजीनामा कुठल्याही परिस्थिती घेतला पाहिजे हे त्यांना सांगितलं आहे”, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

“तसेच महाजनकोकडून त्यांना कसा नफा मिळतो? याचे काही कागदपत्रही अजित पवारांना दाखवले आहेत. बीडमध्ये असलेल्या दहशतीचे फोटो, रिल्स देखील त्यांना दाखवले आहेत. त्यानंतर अजित पवारांनी मला असं सांगितलं की उद्या दुपारी १२ वाजता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत आणि पुढचा निर्णय घेतील. मला खात्री आहे की अशा प्रकराच्या घटनांना महाराष्ट्रात यापुढे थारा दिला जाणार नाही. यासाठी हा लढा सुरु आहे”, असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या भेटीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्या म्हणाल्या, “धनंजय मुंडेंचा राजीनामा तातडीने घेणं गरजेचं आहे. उद्या दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून अजित पवार हे सर्व कागदपत्र दाखवणार आहेत, असं मला अजित पवारांनी आश्वासन दिलं आहे. तसेच योग्य तो निर्णय घेऊ असंही अजित पवारांनी सांगितलं. मी अजित पवारांना धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घेण्याची विनंती केली आहे”, असं विनंती अंजली दमानिया यांनी सांगितलं.

Story img Loader