Anjali Damania On Kunal Kamra Eknath Shinde Controversy : स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते शोमध्ये सादर केल्याप्रकरणी नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरून कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कुणाल कामराविरोधात कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांकडून करण्यात येत आहे.
यातच मुंबईतील खार येथील कुणाल कामराच्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी धुडगूस घातला. या क्लबमधील खुर्च्यांची आणि संपूर्ण सेटची तोडफोड केली. दरम्यान, या तोडफोडीचे व्हिडीओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स अकाउंटवरून शेअर केले आहेत. “याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, कुणाल कामरावर सोडा आधी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करा”, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
अंजली दमानियांनी काय म्हटलं?
“कुणाल कामरा जे म्हणाले ते जर अवडलं नसेल तर त्यांच्या विरुद्ध कायद्याने लढणं अपेक्षित आहे. पण स्वतः सत्तेत असताना कायदा हातात घेऊन हॉटेलमध्ये शिवीगाळ करणं, तोडफोड करणं ह्याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, जी आपल्याला दिसली. कामरावर सोडा आधी FIR हा शिंदे गटाच्या ह्या सगळ्यांवर झाला पाहिजे. त्या हॉटेलचे झालेले नुकसान सुद्धा शिंदेंनी भरून दिले पाहिजे. आपण लोकशाहीत राहतो आणि इथे कायद्याचे राज्य राहील, गुंडगिरीचे नाही”, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
कुणाल कामरा जे म्हणाले ते जर अवडलं नसेल तर त्यांच्या विरुद्ध कायद्याने लढणं अपेक्षित आहे.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 24, 2025
पण स्वतः सत्तेत असताना कायदा हातात घेऊन हॉटेलमध्ये शिवीगाळ करणं, तोडफोड करणं ह्याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, जी आपल्याला दिसली.
कामरावर सोडा आधी FIR हा शिंदे गटाच्या ह्या सगळ्यांवर झाला… pic.twitter.com/mVdESopkqT
कुणाल कामराच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक
कुणाल कामराने खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये शो घेतला होता. या क्लबमध्ये जाऊन एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी धुडगूस घातला. या क्लबमधील खुर्च्यांची आणि संपूर्ण सेटची तोडफोड करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच खिल्ली उडवल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. त्यामुळे शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही शिवसेनेच्या समर्थकांनी जोरदार निर्देशने केली. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याबाहेरही शिवसैनिकांनी कुणाल कामराचे फोटो जाळले.
मुख्यमंत्री फडणवीसांचा कारवाईचा इशारा
कुणाल कामराच्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत कारवाईचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “तुम्ही जरुर स्टँडअप कॉमेडी करा, पण अपमानित करण्याचं काम कोणी करत असेल तर हे सहन केलं जाणार नाही. हे अतिशय चुकीचं आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे. तसेच कुणाल कामरा जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत, ते संविधान जर त्यांनी वाचलं असेल तर संविधानाने सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की त्यांनी माफी मागितली पाहिजे”,असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.