Anjali Damania On Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सातत्याने नवेनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना आज मकोका लावण्यात आला. परंतु, वाल्मिक कराडविरोधात खंडणीचा गुन्हा असल्याने त्याच्यावर मकोका लावण्यात आलेला नाही. दरम्यान, याही पलिकडे जाऊन सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज नवा गौप्यस्फोट केलाय. सतत धमकी, खंडणी आणि अपहरणाची तक्रार करूनही वाल्मिक कराडवर कारवाई न झाल्यानेच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी सुनील केदू शिंदे यांनी केलेली पीसीआरची प्रतच समाजमाध्यमांवर शेअर केली आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या, “अतिशय अतिशय धक्कादायक! सुनील केदू शिंदे ह्या PCR (Personal Criminal Complaint) वाचून मन खूप अस्वस्थ झाले आहे. प्रचंड राग येतोय सगळ्यांपुढे हे महत्त्वाचे मुद्दे ठेवायचे आहेत”, असं म्हणत त्यांनी सुनील शिंदे यांच्याबाबत घडलेला प्रसंग सांगितला आहे.

हेही वाचा >> Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका, वाल्मिक कराडचे काय?

अंजली दमानिया म्हणल्या, “शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराड यांनी त्यांच्या परळी येथील कार्यालयात बोलावून, अवादा कंपनीचे केज तालुक्यातील सर्व काम बंद करा अन्यथा काम चालू ठेवायचे असेल तर २ करोड रुपये द्या असे सांगितले. वेळोवेळी विविध लोकांच्या मोबाइलवरून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचे काम बंद ना ठेवल्यास मारहाणीच्या व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. २८ मे २०२४ रोजी ११ वाजण्याच्या सुमारास याच प्रकरणावरून माझे अपहरण केले होते. याबाबत पोलीस ठाणे केज येथे तक्रार दिली होती. त्यावरून पोलीस ठाणे केज येथे गुन्हा क्रमांक २८५/२०२४ गुन्हा दाखल झाला आहे.” सुनील शिंदे यांच्या तक्रार अर्जात शिवाजी थोपटे यांच्याविषयी ही माहिती देण्यात आली आहे.

बीड पोलिसांवर विश्वास ठेवायचा कसा?

दरम्यान, अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, “इतक्या वेळ जर धमक्या, जीवे मारण्याच्या धमक्या व अपहरण देखील झालं, तर वाल्मिक कराडवर का कारवाई झाली नाही? ही कारवाई वेळेत झाली असती तर आज स्वर्गीय संतोष देशमुख जिवंत असते. या बीड पोलिसांवर आणि गृह खात्यावर आपण विश्वास ठेवून आपण योग्य तपास होईल अशी आशा तरी करू शकतो का?

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या महिन्यापासून चर्चेत आहे. ९ डिसेंबरला बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूर पद्धतीने ठार करण्यात आले होते. या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह बीडमधील लोकप्रतिनिधी आवाज उठवत होते. तसंच, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर आता मकोका लावण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे सुतोवाच काही दिवासंपूर्वीच केले होते. संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर या कायद्याअंतर्गत आता कारवाई होणार आहे. आरोपी प्रतीक घुले, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे आणि महेश केदार यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तर हत्या प्रकरणात सिद्धार्थ सोनवणेलाही आरोपी करण्यात आले आहे.

Story img Loader