Anjali Damania : बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ या दिवशी अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. यानंतर या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण उचलून धरलं आहे. धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीच्या काळात कसा भ्रष्टाचार केला यासंदर्भातले आरोप त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केले. तसंच वाल्मिक कराडवरही त्यांनी आरोप केले आहेत. दोनवेळा त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली आहे. मात्र धनंजय मुंडेंवर कारवाई झालेली नाही. आता अंजली दमानियांनी ( Anjali Damania ) पुन्हा एकदा एक पोस्ट केली आहे जी चर्चेत आहे.

काय आहे अंजली दमानियांची पोस्ट?

धनंजय मुंडे माझे दैवत

वाल्मिक कराड माझे नेते.

असे म्हणणारे बाळाजी तांदळे, यांना पत्र देऊन, त्यांना बरोबर घेऊन, त्यांच्याच जवळच्या मित्रांचा, जे खुनाचे आरोपी आहेत, ह्यांना घेऊन पोलिस शोध करू शकतात का ? जे पकडले गेले, ते “मुद्दाम पकडवून, बळी दिले गेले” यात शंका आहे का ? म्हणूनच कराड फरार राहू शकले आणि आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी दाखवले गेले की पोलिसांचा तपास चालू आहे. जर प्रकरण लावून धरलं नसतं तर कराडला देखील अटक झाली नसती. बालाजी तांदळे, जो जमिनीचा बंदोबस्त करतो, प्रत्येक स्थळी उपस्थित असतो, तो शोधले आरोपींना ? ह्याची नुसती चौकशी करून त्याला सोडून दिले ? ह्याला जर थर्ड डिग्री वापरून चौकशी केली, तर कळेल सगळा कुणाच्या सांगण्यावरून होत होते. पी आय गोसावी आणि भागवत शेलार यांचे सीडीआर जाहीर करा. पहिल्या दोन आरोपींची TIP कुणाकडून आली ? देवेंद्र फडणवीस आता तरी काही बोलणार का अजून त्यांना गरज वाटत नाही? अशी पोस्ट अंजली दमानियांनी ( Anjali Damania ) केली आहे.

अंजली दमानियांनी ( Anjali Damania ) बीडच्या मस्साजोग प्रकरणाबाबत आवाज उठवणं आणि धनंजय मुंडेंवर आरोप करणं हे सातत्याने सुरु ठेवलं आहे. तसंच त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत आहेत. दरम्यान यासंदर्भात आता पुढे काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

अंजली दमानियांचे धनंजय मुंडेंवर याच महिन्यात गंभीर आरोप

इफकोमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचा देखील मुद्दा अंजली दमानिया ( Anjali Damania ) यांनी याच महिन्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थित केला. कृषी घोटाळा नंबर २ चा उल्लेख करत, यामध्ये धनंजय मुंडे कोणत्याही पद्धतीने वाचत नाहीत असेही अंजली दमानिया म्हणाल्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचं एक पत्र माध्यमांना दाखवले. हे पत्र मंत्र्‍यांनी लिहिलेले आहे पण त्यावर तारीख टाकण्यात आलेली नाही असंही त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं. पत्र वाचून दाखवत अंजली दमानिया म्हणाल्या की, दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीती विचारार्थ ठेवण्यात आलेला, मंजुर झालेला कृषीविभागाच्या प्रस्तावाचे इतिवृत्त कायम करण्यात आला असे पत्रात लिहिले आहे. पण अंजली दमानिया यांनी असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचा दावा केला. “याचा अर्थ हा मंत्री कोणत्या थराला जाऊ शकतो याचे हे उदाहरण आहे. २३ आणि ३० तारखेला कुठल्याही प्रकारचा असा निर्णय झालेला नाही,” असे अंजली दमानिया ( Anjali Damania ) यावेळी म्हणाल्या होत्या.

Story img Loader