Anjali Damania Post on Valmik Karad: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा गेल्या चार आठवड्यांपासून तपास चालू आहे. यासंदर्भात रोज वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येत असून त्यात अनेक मोठमोठी नावंही चर्चेत आली आहेत. त्यात चर्चेतली दोन प्रमुख नावं म्हणजे वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा प्रमुख सहभाग होता असा दावा केला जात असून त्यासंदर्भात पोलीस सखोल तपास करत आहेत. पण दुसरीकडे वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचा वरदहस्त असल्याचाही आरोप होत असून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली सोशल मिडिया पोस्ट व्हायरल होत आहे.
अंजली दमानिया यांनी बीड सरपंच हत्या प्रकरणावर अनेकदा सोशल मिडिया पोस्ट करून किंवा प्रत्यक्ष माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केलं आहे. यासंदर्भात त्यांनी अनेक दावे करणाऱ्या पोस्टही केल्या आहेत. या पोस्टमध्ये दाव्यांच्या समर्थनार्थ काही कागदपत्रांचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. त्यांनी आज सकाळी केलेल्या नव्या पोस्टमध्येही अशाच प्रकारे काही कागदपत्र शेअर करण्यात आली असून बीडमधील वाईनच्या दुकानांसंदर्भात त्यांनी आरोप केला आहे. यासाठी त्यांना आलेल्या एका पत्राचा उल्लेख अंजली दमानिया यांनी केला आहे.
काय आहे अंजली दमानिया यांच्या पोस्टमध्ये?
अंजली दमानिया यांनी मंगळवारी सकाळी केलेल्या या पोस्टमध्ये त्यांना एक गोपनीय पत्र आल्याचं म्हटलं आहे. “एक गोपनीय पत्र काल संध्याकाळी आलं. या पत्राची माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या पत्रात लिहिलंय की समाजसुधारक वाल्मिक कराड यांची केज, वडवनी, बीड आणि परळी इथे चार ते पाच वाईनची दुकानं आहेत. या प्रत्येक वाईन दुकानाचा बाजारभाव ५ कोटी इतका आहे. ही जमीन केज येथे १ कोटी ६९ लाखांना २९ नोव्हेंबर २०२४ रोजी घेतली. तीन दिवसांत याला परवानगी दिली गेली. वास्तविक जमिनीचा सातबारा १५ दिवसांनंतर होतो. पण सगळे कायदे कसे धाब्यावर बसवण्यात येतात याचं हे उदाहरण”, असं अंजली दमानिया यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
अंजली दमानिया यांच्या मुख्यमंत्र्यांकडे १० मागण्या
सोमवारी अंजली दमानिया यांनी केलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या एका पत्राचा आणि त्यात त्यांनी केलेल्या मागण्यांचा उल्लेख केला आहे. यात १० मागण्यांचा समावेश आहे.
१. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी
२. धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचे आहेत. म्हणून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे
३. SIT बरखास्त करुन बीड जिल्ह्याबाहेरच्या चांगल्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करावा.
४. हा तपास कॅमेऱ्यासमोर झाला पाहिजे.
५. बीडमध्ये एक मदत क्रमांक सुरू करण्यात यावा. तक्रार देणाऱ्यांच्या ओळखीबाबत गुप्तता पाळण्यात यावी.
६. बिंदुनामावली बीडमध्ये पळाली जात नाही. त्याची सत्यता तपासण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात यावे.
७. सर्व शस्त्रपरवान्यांची चौकशी करण्यात यावी
८. परळी थर्मल प्रोजेक्ट येथे एक विशेष दल नेमण्यात यावे. राख माफियांना आवर घालण्यासाठी हे करण्यात यावे
९. ज्या वाहनांवर नंबर प्लेट्स नाहीत अशी सगळी वाहने जप्त करण्यात यावी
१०. पवनचक्कीची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात यावी व यातून येणारे भाडे हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे.