Anjali Damania Press Conference : बीड सरपंच हत्या प्रकरण आता थेट धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदापर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याशी संबंध असल्याच्या मुद्द्यावरून सध्या धनंजय मुंडे चर्चेचा विषय ठरले आहेत. विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांची भेट घेऊन त्यांना मुंडेंविरोधात काही पुरावे सादर केले आहेत. मात्र त्यानंतरही कारवाई होत नसल्याचं पाहून आता अंजली दमानियांनी मंगळवारी मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिला आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
अंजली दमानियांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर आज सकाळी केलेल्या पोस्टमध्ये उद्या म्हणजेच मंगळवारी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं नमूद केलं आहे. “मंगळवारी सकाळी ११ वाजता माझ्या घरून पत्रकार परिषद घेणार आहे. हे भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल, अशी अपेक्षा. गेले चार दिवस मी त्याच्यावर काम केलं आहे”, असं अंजली दमानियांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
या पोस्टसंदर्भात टीव्ही ९ शी बोलताना अंजली दमानियांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. “आता हाती आलेले सगळे पुरावे अतिशय धक्कादायक आहेत. हे पुरावे जेव्हा जनतेसमोर येतील, तेव्हा मोठा निर्णय घ्यायला जनताच त्यांना भाग पाडेल”, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
“मुंडे फडणवीस, अजित पवारांचे मित्र आहेत म्हणून…”
दरम्यान, धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मित्र असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा उल्लेख अंजली दमानियांनी केला. “सगळ्यांवरच खूप मोठा दबाव आहे. मी हे प्रकरण का लावून धरतेय? कारण जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल असं मला वाटत नाही. इतकं मोठं हत्याकांड महाराष्ट्रात झालंय. त्यात न्याय झाला नाही. का? धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस व अजित पवारांचे जवळचे मित्र म्हणून कारवाई होत नसेल, तर या दोघांनाही माझा निरोप आहे की तुम्ही अशा वेळी मैत्री निभवायची नसते”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.
“उद्या मी पत्रकार परिषदेत मोठा धडधडीत खुलासा करणार आहे. त्यानंतर मला वाटत नाही की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार हे धनंजय मुंडेंची पाठराखण करू शकतील. ही कागदपत्रं जाहीर झाल्यानंतर मी भगवानगडावर कदाचित स्वत: जाऊन नामदेव शास्त्रींना ते दाखवणार आहे. त्यानंतर भगवानगडानं तरी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी विनंती मी त्यांना करणार आहे”, असा उल्लेख दमानियांनी यावेळी केला.
“छगन भुजबळ बहुतेक वाट बघतायत की…”
छगन भुजबळांनी बीडसंदर्भात केलेल्या उल्लेखावर विचारणा केली असता त्यावर दमानियांनी खोचक प्रतिक्रिया दिली. “मला भुजबळांना काहीच म्हणायचं नाहीये. ते बहुतेक वाट बघत असतील की धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला तर त्यांचं मंत्रिपद आपल्याला मिळेल. हे सगळे एका माळेचे मणी आहेत. त्यामुळे भुजबळ धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची वाट पाहात असतील”, असं त्या म्हणाल्या.