Anjali Damania राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती. धनंजय मुंडेंना या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलं असून महिना दोन लाख रुपये पोटगी द्यावी असा आदेश दिले आहे. करुणा मुंडेंनी महिना १५ लाखांची पोटगी मागितली होती. आता पोटगी वाढवून मिळावी यासाठी मी उच्च न्यायालयात जाणार आहे असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी एक पोस्ट केली आहे.
न्यायालयाने काय म्हटलं आहे?
करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात न्यायालयाने निकाल दिला. त्यानुसार, धनंजय मुंडेंनी कौटुंबिक हिंसाचार केल्याचं कोर्टाकडून अंशतः मान्य करण्यात आलं आहे. तसंच न्यायालयाने धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांना देखभाल खर्च म्हणून महिना १ लाख २५ हजार आणि मुलीचं लग्न होईपर्यंत महिना ७५ हजार असे दोन लाख रुपये द्यावेत असंही निकालात म्हटलं आहे. या सगळ्यानंतर अंजली दमानियांची पोस्ट समोर आली आहे.
काय म्हटलं आहे अंजली दमानियांनी?
“करुणा मुंडे या फॅमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या. त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी.करुणा, या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि १,२५,००० रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.” अशी पोस्ट अंजली दमानियांनी केली आहे.
करुणा शर्मा धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचा न्यायालयाच्या निकालात उल्लेख करण्यात आला आहे. खटल्याबाबत माहिती देताना करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांची मी पत्नी आहे की नाही? हे आधी आम्हाला सिद्ध करावे लागले. जे आमच्या वकिलांनी सिद्ध करून दाखवले आहे. करुणा मुंडे यांचे वकील गणेश कोल्हे यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले की, करुणा मुंडे यांना मासिक १ लाख २५ हजार आणि मुलीला लग्नापर्यंत मासिक ७५ हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या की, यापुढे माझा उल्लेख करुणा शर्मा नाही तर करुणा धनंजय मुंडे असा करावा. कारण न्यायालयाने मला पहिल्या पत्नीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे मी मुंडे नावासाठी जी लढाई लढत होती, ती यशस्वी झाली आहे.