दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांच्याशी गैरवर्तन झाल्याचं आणि त्यांना कथितपणे मारहाण झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. त्यानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही त्यांची भूमिक स्पष्ट केली आहे. अंजली दमानिया यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – स्वाती मालिवाल यांची लेखी तक्रार, आता मारहाण प्रकरणाची चौकशी करणार दिल्ली पोलीस
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
“स्वाती मालिवाल यांच्या प्रकरणावर मी भूमिका घेतली नाही, तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. खरं तर आम आदमी पक्षानेही मान्य केले आहे की, विभवचे वर्तन चुकीचे होते. त्यामुळे त्याला लगेच स्वाती मालिवाल यांची माफी मागायला सांगायचे होते”, अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली. “जर आम आदमी पक्ष स्वत:ला इतरांपेक्षा वेगळा राजकीय पक्ष मानत असेल, त्यांनी इतर राजकीय पक्षांप्रमाणे वागू नये, असेही त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना त्यांनी याप्रकरणावरून भाजपालाही लक्ष्य केलं. भाजपाकडून याप्रकरणाचे राजकारण केलं आहे, असा आरोप त्यांनी केला. याबरोबरच “मला आम आदमी पक्षाची काळजी असून मी या पक्षाचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही. मात्र, ते जर काही चुकीचं करत असतील, तर मी नक्कीच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
स्वाती मालिवाल प्रकरणावर आपने काय म्हटलं?
या प्रकरणावर आम आदमी पक्षानेही प्रतिक्रिया दिली आहे. आप नेता संजय सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलं आहे, “ही घटना अत्यंत निंदनीय आहे. अरविंद केजरीवाल यांना भेटायला स्वाती मालिवाल गेल्या होत्या. त्या जेव्हा केजरीवाल यांची वाट बघत होत्या तेव्हा विभव कुमार यांनी त्यांच्याशी गैरव्यवहार केला आणि कथित मारहाणही केली. या सगळ्या घटनेनंतर आता स्वाती मालिवाल यांनी दिल्ली पोलिसांना या प्रकरणात लेखी तक्रार दिली आहे. दिल्ली पोलिसांचं पथक स्वाती मालिवाल यांच्या घरी गेलं होतं तिथे त्यांचा जबाब नोंदवण्यात आला.”
हेही वाचा – स्वाती मालिवाल यांचा जबाब नोंदवण्यासाठी घरी पोहचलं पोलिसांचं पथक, महिला आयोगाचं विभव कुमारांना समन्स
भाजपाकडून आपला घेरण्याचा प्रयत्न
दरम्यान, या प्रकरणावरून भाजपानेही आम आदमी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाचे नेते गौरव भाटिया म्हणाले, “याबाबतीत अरविंद केजरीवाल यांना यांनी उत्तर दिलं पाहिजे. पण ते काही बोलणार नाहीत कारण ते कायर आहेत. मला तर वाटतं आहे की केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. जे काही स्वाती मालिवाल यांच्याबाबत घडलं आहे त्यामुळे देशाच्या महिला वर्गामध्ये प्रचंड राग आहे. महिला हा स्वतःचा अपमान समजत आहेत. यासाठी फक्त केजरीवाल जबाबदार आहेत.”